सातारा दि. 4 :- चिंचणेर गावाची भोगोलिक संरचना व ग्रामस्थांनी बीजोत्पादनात व सेंद्रिय शेतीत केलेल योगदान बघता या गावची कृषि पर्यटनाचे गाव म्हणून संपूर्ण राज्यात नाव लौकिक व्हावे यासाठी शासकीय यंत्रणा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही सातारचे तहसीलदार नागेश गायकवाड यांनी दिली.
मोजे चिंचणेर निंब ता. सातारा येथे ग्रामबीजोत्पादन कार्यशाळा ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेत तहसीलदार श्री. गायकवाड बोलत होते. यावेळी बोरगाव येथील कृषी विज्ञान केंद्र डॉ. महेश बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात विजय जाधव यांनी ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमाच्या माध्यमातून या गावात ४ पिकांचे १० पेक्षा जास्त वाणाचे बीजोत्पादन घेऊन राज्यातील २६ जिल्हे व साधारणपणे इतर ५ राज्यात दर्जेदार बियाणे पुरवठा करण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले. त्या माध्यमातून गावात इतर राज्यातील शेतकरी भेटी देत असल्याचे सांगितले.
उपस्थितांनी यांत्रिकीकरण,जैविक निविष्ठा , रेशीम उद्याग, विविध बियाणे, सुपर केन रोपवाटिका इ. स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. मान्यवरांचे हस्ते सूर्यास्त पाइंट वर वृक्षारोपण करण्यात आले. कृषि सहाय्यक धनाजी फडतरे यांनी सोयाबीन बीजोत्पादन प्लॉटला शिवार फेरी घेऊन सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेला चिंचणेर परिसरातील शेतकरी व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.