फलटण प्रतिनिधी :
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025 स्वच्छ भारत अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यास अनुसरून 'स्वच्छता हीच सेवा ' मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत विडणी ता .फलटण येथे स्वच्छता श्रमदान अभियानाचे आयोजन करून गावाचा परिसर स्वच्छ करण्यात आला त्याला ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हा परिषद ,पंचायत समिती स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 या मोहिमेचा शुभारंभ विडणी येथे परिसर स्वच्छतेचा उपक्रम राबवून करण्यात आला. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या कामगिरीचे मूल्यांकन करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेत गावातील रस्ते ,शालेय परिसर, मंदिरे, अंगणवाडी, गटारे व इतर ठिकाणी साफसफाई , रस्ते दुरुस्ती करण्यात आली. दरम्यान आपले गाव स्वच्छ व सुंदर हरित करण्याचे नियोजन करण्यात आले असून विडणी गाव च्या लोकसंख्ये इतकीच देशी झाडे लावण्याचा मानस गावचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी व्यक्त केला. या स्वच्छता अभियानामध्ये सरपंच सागर अभंग, उपसरपंच सौ मनीषा नाळे, ग्रामपंचायत सदस्य, विडणी गावच्या पोलीस पाटील सौ. शितल नेरकर, ग्राम विकास अधिकारी अंकुश टेंबरे, उत्तरेश्वर विद्यालय, प्राथमिक चे शिक्षकवर्ग , अंगणवाडी कर्मचारी ,आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, मंडळाचे पदाधिकारी, शालेय विद्यार्थी, महिला, युवक बहुसंख्येने सहभागी झाले होते