फलटण प्रतिनिधी -
फलटण शहरातील मुख्य बाजारपेठेत ( सुपर मार्केट, महात्मा फुले चौक ) भाजी विक्रेत्यांना सतत पारधी व तृतीयपंथीय गटांकडून होणाऱ्या त्रासामुळे विक्रेत्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाजीपाला विकणाऱ्या महिलांकडून जबरदस्तीने पैसे उकळण्याचे प्रकार वाढले असून त्यामुळे छोट्या विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तर काही पारधी समाजातील व्यक्तींकडून भाजीपाला जबरदस्तीने उचलून नेण्याचे प्रकार होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
भाजी विक्रीतून मिळणारा अल्प नफा हा या छोट्या विक्रेत्यांच्या उपजीविकेचा आधार आहे. परंतु बाजारपेठेत आलेल्या पारधी समाजातील काही लोकांकडून भाजीपाला उचलून नेल्याने विक्रेत्यांना तोटा सहन करावा लागतो. या प्रकारामुळे विक्रेते अस्वस्थ असून ग्राहकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विक्रेत्यांनी प्रशासनाकडे लक्ष वेधून घेतले असून, याबाबत तातडीने उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी केली जात आहे. “आम्ही दिवसभर उन्हात उभे राहून मेहनत करतो. मात्र संध्याकाळी अचानक कोणी भाजी उचलून नेली तर त्याचा फटका आमच्याच कुटुंबावर बसतो,” अशी हळहळ भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भात अनेक वेळा पोलीस प्रशासनाकडे तक्रारी देण्यात आल्या असल्या तरी ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, “जर परिस्थिती अशीच राहिली तर आम्हाला रोजीरोटी गमवावी लागेल.”
शहरातील नागरिक व व्यापारी संघटनांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पारधी व तृतीयपंथीय गटांकडून होणाऱ्या त्रासाला आळा घालावा, अशी मागणी केली आहे.