फलटण प्रतिनिधी :
फलटण नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, भाजपच्या गोटात उमेदवारीच्या चर्चेला वेग आला आहे. पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांनी सौ. अनिता प्रशांत काकडे यांना नगरपालिकेची प्रभाग दोन मधून उमेदवारी द्यावी, अशी ठाम मागणी पुढे केली आहे. या मागणीमुळे फलटण भाजपच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.
सौ. अनिता प्रशांत काकडे या सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सुदर्शन काकडे यांच्या पत्नी आहेत. प्रशांत काकडे पक्षाशी निष्ठेने कार्यरत आहेत. समाजकारण, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणाऱ्या या कार्यकर्त्या म्हणून सौ. अनिता काकडे यांची ओळख आहे. त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमांत तसेच निवडणुकीतील प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे “तळागाळातील प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळावी” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र आहे.
भाजपच्या आतल्या गोटात मात्र उमेदवारीच्या चर्चेला वेगळाच रंग चढला आहे. काही वरिष्ठ नेते आपापल्या गटातील नावे पुढे करत असल्याचेही समजते. अशा पार्श्वभूमीवर काकडे यांच्या नावाने स्थानिक पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे सूत्रांकडून कळते.
सौ. अनिता काकडे यांनी “पक्षाने विश्वास दाखवला तर नागरिकांच्या समस्यांवर काम करण्यास मी सदैव तत्पर आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, महिला आघाडीसह तरुण कार्यकर्त्यांकडूनही त्यांच्या नावाला जोरदार पाठिंबा मिळत आहे.
राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू आहे की, भाजपने यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची धोरणात्मक भूमिका घेतली, तर अनिता प्रशांत काकडे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता अधिक आहे.