फलटण : सचिन मोरे
आम्हाला कुठे थांबायचं हे कळतं ... या आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विधानाने तालुक्यात काही दिवसापासून चर्चा सुरु झाल्या आहेत. तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे लुटूपुटूच्या राजकीय लढाया तर लढणार नाहीत ना अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. दोन्ही निंबाळकरांचे पॅचअप झाल्याचे ही चर्चा आता जोर धरू लागली आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दोन्ही पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्धी. मात्र एका कार्यक्रमाच्या निमित्ताने फलटण मध्ये दोघेही एका व्यासपीठावर आले. बिगर राजकीय या कार्यक्रमात हे काय बोलणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र दोन्ही मुसद्दी राजकारण्यांनी सावध पवित्रा घेतला. तर आमदार रामराजे यांनी आम्हाला राजकारणात कोठे थांबायचे हे कळतं या विधानाने दोन्ही निंबाळकरांचे राजकीय patch up झाल्याचे संकेत मिळाल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. लोकसभा निवडणुकीमध्ये माजी खासदार रणजितसिंह यांचा झालेला पराभव तर विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार सचिन पाटील यांना विजयी करत रणजीतसिंह यांनी काढलेला रामराजेंचा राजकीय वचपा हे दोन्हीही निंबाळकरांचा राजकीय पराभव म्हणावा लागेल.
सध्या स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. फलटण तालुक्यात दोन्हीही निंबाळकर गटाला वगळून तिसरी आघाडी उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विविध पक्ष व गटातील काही महत्त्वाचे नेते एकत्र येऊन आगामी निवडणुकीत पर्यायी नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, ही तिसरी आघाडी जर प्रत्यक्षात आली तर फलटणच्या राजकीय पटलावर मोठा बदल घडवू शकते. मात्र नेमके कोण कोण या आघाडीत सामील होणार आणि तिचा निवडणुकीतील परिणाम किती होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्याच्या घडीला या हालचालींमुळे फलटणमध्ये राजकारण आणखी तापले असून, सर्वच पक्ष व गटांचे लक्ष या नव्या समीकरणाकडे लागले आहे.
गेल्या काही वर्षांत फलटण तालुक्यातील मोठमोठे राजकीय निर्णय व सत्ता समीकरणे दोन्हीही निंबाळकर गटाच्या भोवती केंद्रीत राहिली. विधानसभा असो वा पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा नगरपालिका – बहुतेक ठिकाणी या गटाचा प्रभाव जाणवत होता. परंतु, याच काळात काही नेते व कार्यकर्त्यांमध्ये असंतोष साचत होता. “निंबाळकर विरहित पर्याय” या संकल्पनेवर चर्चा सुरू झाली आणि आता त्याला प्रत्यक्ष रूप देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न
काही माजी पदाधिकारी, युवक नेते आणि दोन्हीही निंबाळकर गटातून नाराज झालेले कार्यकर्ते या नव्या आघाडीत सामील होण्याच्या हालचाली करत आहेत. या आघाडीला स्थानिक सामाजिक संघटनांचेही गुप्त पाठबळ असल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुकांत दोन्हीही निंबाळकर गटाला धक्का देण्याचा या तिसऱ्या पर्यायाचा हेतू स्पष्ट दिसतो आहे.
संभाव्य परिणाम
सत्तासमीकरणात बदल – जर या आघाडीत पुरेसा जनाधार मिळाला, तर दोन्हीही निंबाळकर गटाचे वर्चस्व आव्हानात येऊ शकते.
विरोधी मतांचे एकत्रीकरण – निंबाळकरांविरोधात असलेले लहानमोठे असंतुष्ट गट एकत्र आले तर त्यांचा परिणाम काही मतदारसंघात निर्णायक ठरू शकतो.
राजकीय गोंधळ वाढण्याची शक्यता – तीन आघाड्यांच्या संघर्षामुळे मतविभाजन होऊ शकते, ज्याचा फायदा कोणाला होणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरू शकते.