मुंबई :
भारतीय हवामान विभागाकडून ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराच्या धोक्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सतर्क राहावे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे. धोकादायक भागात जाणे टाळावे. पूरप्रवण क्षेत्रात जाणे टाळावे. वीज पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे. पुरापासून बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्यावी. पुराच्या आपत्तीपासून वाचण्यासाठी स्थानिक निवारा केंद्राचे सहाय्य घ्यावे, पूर परिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे. पूर परिस्थितीत नदी नाल्यांच्या पुलावरुन पाणी जात असताना रस्ता ओलांडू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.