फलटण प्रतिनिधी :
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांची नुकतीच उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून गडचिरोली येथे जात पडताळणी विभागात पदोन्नती झाली असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सत्कारावेळी बोलताना मान्यवरांनी महाडिक यांच्या कार्यपद्धतीचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण पोलीस ठाण्याने अनेक गुन्ह्यांचा तपास वेगाने पूर्ण करून गुन्हेगारांना न्यायालयात उभे केले. तसेच समाजातील विविध घटकांशी संवाद साधत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गावोगाव होत असलेल्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना त्यांनी उपस्थित राहून पोलिस व नागरिक यांच्यातील दरी कमी केली. गुन्हेगारीवर नियंत्रण, वाहतूक शिस्त, महिलांवरील अत्याचार रोखणे यासह अनेक सामाजिक उपक्रमांतून महाडिक यांनी आपली छाप सोडली आहे. त्यांच्या कामामुळे पोलिस यंत्रणेवर सर्वसामान्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
सत्कार कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रामाणिक व कार्यतत्पर सेवेला दाद देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी महाडिक यांनी सर्वांचे आभार मानत, “कायद्याचे राज्य अबाधित ठेवण्यासाठी व नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू,” असे आश्वासन दिले. तर गेल्या 23 वर्षात सेवेत फलटण सारख्या सुसंस्कृत शहरात सर्वांत चांगली लोक आपल्याला पाहायला मिळाल्याचे महाडिक यांनी आवर्जून उल्लेख केला. तर पोलीस प्रशासन व पत्रकार यांच्यातील समन्वयाचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
फलटण तालुका पोलिस दलासह स्थानिक नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत असून, पदोन्नतीमुळे महाडिक यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने, दीपक पवार, मच्छिन्द्र पाटील, शिवाजी जायपत्रे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष हणमंत सोनवलकर, तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष व गुणवरेचे पोलीस पाटील अमोल आढाव यांच्यासह अनेक मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, व्यावसायिक व पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.