येत्या नगरपालिका निवडणुकीत फलटण शहरात पुन्हा एकदा “निंबाळकर विरुद्ध निंबाळकर” अशी थरारक राजकीय लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. नगराध्यक्ष पद यंदा खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने दोन्ही गटांतील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. मात्र या निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठी नवा चेहरा येणार अशी चर्चा आता फलटण शहरात रंगू लागली आहे. विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र माजी नगरसेवक ॲड. अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे राजे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे ज्येष्ठ बंधू माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असण्याची चर्चा सध्या फलटणच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
फलटण शहरातील राजकारणात विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर गटाच्या वर्चस्वाचा इतिहास जुना आहे. मागील तीन दशकाहून अधिक काळ नगराध्यक्षपदावर राजे गटाचे प्रतिनिधी राहिले आहेत. तर खासदार गटाने लोकसभेच्या पराभवाचा वचपा विधासभेत काढत राजे गटाचा पराभव केला करत तालुक्यात नवीन राजकीय ताकत निर्माण केलेचे दाखवून दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रणजितसिंह गटाकडून शहरात विविध विकासकामांची यादी दाखवून जनतेसमोर विश्वास जिंकण्याचा प्रयत्न होणार आहे. तर राजे गट विधानसभेच्या पराभवानंतर आपले अस्तित्व टिकवण्यासाठी कंबर कसणार आहे.
दरम्यान, शहरातील मतदार मात्र यावेळी विकासाच्या मुद्द्यावर मतदान करणार असल्याचे मत व्यक्त करत आहेत. पाणीपुरवठा, मलनिस्सारण, रस्ते आणि बाजारपेठेतील वाहतूक हा निवडणुकीतील मुख्य अजेंडा ठरणार आहे.
स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन त्यांचबरोबर शहर विकास आराखडा हाही प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. शहराचा विस्तार कसा होईल, कोणत्या ठिकाणी कोणत्या इमारती बांधल्या जातील, हे ठरवण्यासाठी नियोजन देखील शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे मान्यता येत आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. त्यामुळे फलटण शहर पुन्हा एकदा राजकीय तापमानाने गरम झाले आहे.
- समशेरसिंह नाईक निंबाळकर – नगरपालिकेचे माजी नगरसेवक असून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे जेष्ठ बंधू आहेत. कार्यकर्त्यांमध्ये दमदार संघटनशक्ती आणि राजकीय दांडगा अनुभव.
- श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर – रामराजे यांचे सुपुत्र असून, नव्या पिढीचा चेहरा म्हणून त्यांची ओळख बनत आहे. तरुण मतदारवर्ग आणि नवीन नेतृत्वाची झलक दाखवण्याची संधी ते शोधत आहेत.