फलटण / प्रतिनिधी :
संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या ७५५ व्या जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) या संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन करण्यात आले असून ही सायकलवारी कार्तिक शुध्द एकादशी रविवार दि . २ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता श्री क्षेत्र पंढरपूरहून श्री क्षेत्र घुमाण कडे प्रस्थान ठेवेल अशी माहिती पालखी सोहळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुभाष भांबुरे यांनी दिली .
भांबुरे म्हणाले , भागवत धर्म प्रसारक मंडळ , पालखी सोहळा पत्रकार संघ , श्री नामदेव दरबार कमिटी , घुमाण व समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण या सुमारे २५०० किलोमीटरच्या रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन करण्यात येते . वारीचे हे चौथे वर्ष आहे . रविवार दि. २ नोव्हेंबर ते दि. ३ डिसेंबर २०२५ या दरम्यान या रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे .
कार्तिक शु|| एकादशी संत नामदेव महाराज यांची ७५५ वी जयंती , संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा व गुरुनानक जयंती याचे औचित्य साधून संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर येथील जन्मस्थानावरुन या यात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे . या सायकल यात्रेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर सायकल रायडिंग केलेल्या व ५० पेक्षा अधिक वयोमान असलेल्या सुमारे ११० सायकलपटूनी सहभाग नोंदविला आहे. ही रथ यात्रा व सायकल वारी महाराष्ट्रासह गुजरात , राजस्थान , हरियाणा व पंजाब राज्यातून मार्गक्रमण करणार आहे . राष्ट्रीयस्तरावर निघणारी ही देशातील पहिली आध्यात्मिक सायकल वारी असून या वारीद्वारे भागवत धर्माच्या शांती , समता आणि बंधूता या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येतो .
या वेळी भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, संत नामदेव महाराजांचे वंशज ज्ञानेश्वर माऊली नामदास , महाराष्ट्र राज्य समन्वयक बापूसाहेब उंडाळे , पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर टेमघरे, सचिव ॲड विलास काटे, खजिनदार मनोज मांढरे, विश्वस्थ राजेंद्रकृष्ण कापसे, राजेंद्र मारणे , सल्लागार डॉ राजगोपाल खंडेलवाल आदी उपस्थित होते .