फलटण प्रतिनिधी :
आजच्या काळात प्रामाणिकपणाचे उदाहरण विरळच दिसते, परंतु फलटण एसटी आगारातील अक्षय राजेंद्र जाधव राहणार गुणवरे तालुका फलटण या एसटी चालकाने दाखवलेला आदर्श संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. प्रवाशाचे बसमध्ये विसरलेल्या तब्बल अडीच लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची पर्स या चालकाला सापडली आणि त्याने कुठलाही विचार न करता ती एसटी आगार प्रशासनाकडे सुपूर्द केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा हून फलटण कडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये एका प्रवाशाने आपले सोन्याचे दागिने असलेली पर्स विसरली होती. बस फलटण आगारात परतल्यानंतर चालकाला ती पर्स सापडली. पर्समध्ये सोन्याचे दागिने असल्याचे लक्षात आल्यानंतरही चालक अक्षय जाधव यांनी प्रामाणिकपणे ती आपल्या वरिष्ठांकडे जमा केली.
नंतर चौकशीत ती पर्स संजय संपतराव भोईटे हिंगणगाव ता. फलटण (नेकलेस आणि अंगठी) यांची असल्याचे समोर आले. प्रशासनाच्या उपस्थितीत दागिने त्यांना परत देण्यात आले. यावेळी स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे व वाहतूक निरीक्षक संजय नाळे, सुरक्षारक्षक गुंजवटे मेजर शहर पोलीसचे बडे कॉन्स्टेबल उपस्थित होते. घटनेनंतर त्या प्रवाशाने चालकाचे मनःपूर्वक आभार मानले.
या प्रामाणिक कृत्याबद्दल एसटी विभागाकडून चालक अक्षय जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आगार प्रमुख मुल्ला मॅडम, सुखदेव अहिवळे, धीरज अहिवळे यांच्यासह फलटण बस आगारातील विविध मान्यवरांनी चालक अक्षय जाधव यांचे अभिनंदन केले.
फलटणकरांमध्ये या घटनेची जोरदार चर्चा असून, “अजूनही समाजात प्रामाणिक माणसं आहेत” असे मत सर्वत्र व्यक्त होत आहे.