फलटण प्रतिनिधी :
शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसेंदिवस अति वेगाने वाहनं धावत असल्याने अपघातांचा धोका गंभीर स्वरूप धारण करू लागला आहे. कॉलेज रोड, बसस्थानक परिसर, पुणे–पंढरपूर महामार्ग, तसेच मध्यवर्ती बाजारपेठेत तरुण वर्गाने दुचाकी व चारचाकी वाहनांचा बेफाम वेग घेतल्याने वाहतूक कोंडी, अपघात व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर शहरातील तरुण वर्गामध्ये अति वेगाने दुचाकी चालवण्याबरोबरच, सिलेंसर काढून किंवा बदल करून मोठ्या आवाजात गाड्या चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी नागरिक त्रस्त झाले असून रात्री उशिरापर्यंतही या आवाजामुळे लोकांच्या विश्रांतीत व्यत्यय येत आहे.
अलीकडच्या काही दिवसांत लहान-मोठे अपघात घडल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पादचारी, शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना रस्ते ओलांडताना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पालक वर्गामध्ये तर विशेष चिंता व्यक्त केली जात असून, आपल्या मुलांचे प्राण धोक्यात आहेत अशी भावना व्यक्त होत आहे.
कॉलेज रोड, बसस्थानक परिसर, मध्यवर्ती बाजारपेठ, तसेच पुणे–पंढरपूर महामार्गावर काही ठिकाणी तरुण दुचाकींच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने धाव घेतात. या आवाजामुळे वृद्ध नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे
वाहतूक पोलिसांची मर्यादित कारवाई :
वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई होत असली तरी ती अपुरी ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विना-परवाना गाड्या चालवणारे तरुण, तसेच रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली "रेस" प्रकारची धोकादायक वाहनचालकांची कृत्ये पोलिसांच्या नजरेतून सुटत असल्याचा आरोप होत आहे.
- नागरिकांची मागणी -
- स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत :
- शहरातील सर्व प्रमुख चौकांवर सीसीटीव्ही कॅमेरे व स्पीड गन बसवाव्यात.
- बदललेले/काढलेले सिलेंसर असलेल्या दुचाकींवर बंदी आणावी.
- शाळा व काॅलेज परिसरात वाहतूक पोलिसांची विशेष गस्त घालावी.
- वेगमर्यादा काटेकोरपणे लागू करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी.
अपघात होण्यापूर्वी उपाययोजना आवश्यक :
नागरिकांचे म्हणणे आहे की, अपघात घडल्यावर केवळ दु:ख व्यक्त करण्याऐवजी प्रशासनाने आगाऊ उपाययोजना करणे गरजेचे आहे. वाहतूक नियंत्रणासाठी शहरातील रस्त्यांवर आवश्यक त्या सूचना फलक, वेग मर्यादा दर्शविणारे बोर्ड आणि वेगरोधक उभारणे ही काळाची गरज असल्याचेही नागरिकांनी नमूद केले आहे.
फलटण शहरात अति वेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण आणून, वाहतूक शिस्तबद्ध करणे आणि नागरिकांचे प्राण वाचवणे हे प्रशासनापुढे तातडीचे आव्हान बनले आहे.