13 ऑक्टोबर 2025 पर्यत नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात - मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव ; सध्याची मतदार यादी प्रारूप आहे. ज्याकाही हरकती आहेत त्या 13 तारखेपर्यंत नोंदवायच्या आहेत. प्रत्यक्ष स्थळ पाहणी करिता बीएलओ आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांचे पथक येणार आहे. कागदपत्रे व स्थळ पाहणीच्या अहवाला नंतर आपण निर्णय घेणार आहे. शनिवार आणि रविवारी कामकाज सुरु राहणार आहे.
फलटण │ आगामी नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ उघड झाला आहे. तब्बल १३ प्रभागांमधील शेकडो मतदारांची नावे चुकीच्या ठिकाणी म्हणजेच दुसऱ्याच प्रभागात नोंदवली गेली आहेत. यामुळे मतदारांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकांनी आपले मतदार ओळखपत्र हातात घेऊन यादी तपासली असता, आपले नाव शेजारच्या प्रभागात किंवा दूरच्या भागात नोंदवले गेले असल्याचे लक्षात आले. काही ठिकाणी संपूर्ण कुटुंबातील सदस्यांचे पत्ते वेगवेगळ्या भागात दिसत आहेत.
यामुळे नागरिकांना मतदानाच्या दिवशी मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो. निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादीतील या गोंधळामुळे मतदार केंद्रांवर गोंधळ आणि रांगा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांचा सवाल आहे की, “प्रभाग पुनर्रचनेनंतर प्रशासनाने पुनर्तपासणी का केली नाही?” स्थानिक निवडणूक विभागाचे अधिकारी मात्र म्हणतात की, “नावे तपासून दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी संबंधित नगरपालिका कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.”
दरम्यान, राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनीही यावर आक्षेप घेत “ही प्रशासनाची मोठी चूक असून त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होऊ शकतो” अशी टीका केली आहे.
फलटणकरांचे मत:
“प्रत्येक वेळी यादीत गोंधळ होतोच, पण यंदा तर हद्दच झाली,” असे एका नागरिकाने संतापाने सांगितले.
मतदार याद्यांतील हा गोंधळ तातडीने दूर न झाल्यास आगामी नगर पालिका निवडणुकीवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१३ प्रभागांतील मतदारांची नावे वेगवेगळ्या प्रभागात प्रशासनावर नाराजीचा पाऊस
नगरपालिका निवडणुकीपूर्वी मतदार यादीचा ‘गोलमाल’ – प्रशासन झोपले का?