फलटण | धैर्य टाईम्स |
येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती त्याचबरोबर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकारण यापूर्वीच पेटले आहे. तालुक्यातील दोन्ही गटांचे नक्की ठरलयं काय याकडे लक्ष लागून राहिले आहे. कधी पॅचअप, तर कधी प्रवेशाचा मुहूर्त याने तालुक्यातील राजकारणाची उत्सुकताच शीगेला पोहोचली आहे. असे म्हटले जाते की, राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. त्यातच सोशल मीडियावर ते पुण्यात व मुंबईत बैठका करत आहेत अशा चर्चाना उधान आले आहे.
आज सकाळी मनसेचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटातील अभिनेते सयाजी शिंदे, नागेश भोसले व मकरंद अनासपुरे यांचा एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये चित्रपटातील राजकीय विरोधक अभिनेते सयाजी शिंदे व नागेश भोसले हे एकत्र आल्याचे दाखविले आहे. यावेळी पत्रकार दोघांना आपण आमदार होणार असल्याचे ठरवले होते त्याचे काय? असा प्रश्न विचारतात त्यावर पक्षश्रेष्ठी त्यांना परिषदेवर घेणार असल्याचे सांगून प्रसंग संपतो. तर कार्यकर्ते मकरंद अनासपुरे मंदिरात जाऊन परमेश्वरासमोर झालं ना समाधान, झाले ना दोन डाकू एकत्र अशी चिंता व्यक्त करतात.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय परिस्थितीत अशीच तर नाही ना? अशी चर्चा आता कार्यकर्ते करू लागले आहेत.
तूर्तास एवढेच... नवीन अपडेट्स घेऊन लवकरच....