फलटण : (प्रतिनिधी )
मुंजवडी ता. फलटण येथील एका शेतकऱ्याने विना परवाना अवैध उत्खनन केल्या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे एका निवेदणाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी सातारा व तहसीलदार फलटण यांना देण्यात आल्या आहेत. मुंजवडी येथील या अवैध उत्खनन प्रकरणी फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
संबंधित सविस्तर वृत्त असे, मुंजवडी येथील गणपत तुकाराम रणदिवे यांनी त्यांच्या मालकीच्या गट नं. 738 मध्ये जे. सी. बी च्यासाहाय्याने खोदुन व त्या मातीची वाहतुक टिपरच्या साहाय्याने करण्यात आली असल्याची तक्रार फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्या कडे तक्रारदार यांनी केली आहे.
या संबंधी मुंजवडी येथील गावकामगार तलाठी खाडे यांना तक्रारदार यांनी वारंवार तोंडी कल्पना देवुनही कसल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. गावकामगार तलाठी यांचे कडे पाठपुरावा केला असता कारवाई आज होईल उद्या होईल अशी टोलवा टोलवीची उत्तरे दिलेली आहेत परंतु अद्यापही कसल्याही प्रकारची कारवाई झालेली नसल्याने उपविभागीय अधिकारी यांना सदर अवैध घटनेची माहिती लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे सदर बेकायदेशिर उत्खनन प्रकरणी तात्काळ चौकशी व्हावी व संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे.
या गंभीर प्रकाराकडे महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचा-यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अवैध उत्खनन झाल्याने परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. अवैध उत्खननावर शासकीय पातळीवर नेमकी काय कारवाई होणार याकडे आता फलटण तालुक्याचे लक्ष लागून आहे.