फलटण | धैर्य टाईम्स |
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत नागरिकांच्या गहाळ झालेल्या १२ लाख ७० हजार रुपयांच्या ७४ मोबाइलचा शोध घेऊन ते संबंधित नागरिकांना परत करण्यात फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यशस्वी झाले आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सी.इ.आय.आर. पोर्टलच्या माध्यमातून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील डी. बी. पथकाला सदर मोबाइलचा शोध घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार या पथकाने सी.इ.आय.आर. पोर्टल व तांत्रिक माहितीच्या आधारे सदर मोबाइलचा शोध सातारा जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यात आणि कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या राज्यात घेऊन वापरकर्त्यांना संपर्क करून मोबाइल तातडीने कुरिअर अथवा अन्य मार्गाने परत करण्याच्या सूचना केल्या होत्या. सतत पाठपुरावा केल्यानंतर मोबाइल ग्रामीण पोलीस ठाण्यात प्राप्त झाले. पालखी सोहळ्या दरम्यान वारकरी व भक्तांचे गहाळ झालेले मोबाइल हाती येताच ते संबंधितांना कुरिअरने पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सदर मोहीम यापुढे सुरू राहणार असल्याचे सुनील महाडिक यांनी सांगितले. ही कामगिरी जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जी. बी. बदने, पोलीस हवालदार नितीन चतुरे, श्रीनाथ कदम, अमोल जगदाळे, हनुमंत दडस यांनी केली. मोबाइल चोरीस गेला अथवा हरवला की लगेच सी.इ.आय. आर. पोर्टलवर आपले नाव, पत्ता, इ-मेल आय.डी., वापरत असलेला मोबाइल क्रमांक टाकला तर तक्रारदार घरी बसून आपल्या संगणकावरून तक्रार दाखल करू शकतात. सायबर क्राइम झाल्यावर आपण तत्काळ NCCRPT पोर्टलवर माहिती भरल्यास आपले खाते लॉक होते. पोलीस ठाण्यात तक्रार देण्याअगोदर या पोर्टलवर माहिती भरल्यास फायदा होत असल्याचे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.