फलटण प्रतिनिधी :
एका अकॅडमी चालकाला गांजा आणि पिस्तूलच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट फलटण ग्रामीण पोलिसांनी उधळून लावला असून, या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. व्यावसायिक स्पर्धेतून एका व्यावसायिकाच्या गाडीत १८ किलो गांजा आणि गावठी पिस्तूल ठेवून पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार मात्र फरार झाला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २७ ऑगस्ट रोजी मौजे दालवडी येथे एका स्विफ्ट डिझायर कारमध्ये गांजा आणि पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून गाडीचे मालक रवींद्र कोलवडकर यांच्या उपस्थितीत गाडीची तपासणी केली असता, त्यात १८ किलो गांजा (किंमत ४.३० लाख), एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
रवींद्र कोलवडकर यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी आपल्याला व्यवसायातील स्पर्धेतून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला. त्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांचा पूर्वीचा व्यावसायिक भागीदार कुमार उर्फ ज्ञानेश्वर परदेशी याच्यासोबत अकॅडमी चालवण्यावरून वाद होता. परदेशी याने, “अकॅडमी बंद केली नाहीस तर खोट्या गुन्ह्यात अडकवीन,” अशी धमकी दिली होती. पोलिसांनी अधिक तपास केला असता, ज्या समीर पवार नावाच्या व्यक्तीने यापूर्वीही कोलवडकर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता, त्याच व्यक्तीच्या मोबाईल नंबरवरून पोलिसांना टीप देण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
या माहितीच्या आधारे, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून जयेश जाधव, अनिल गजरे, ओंकार खराडे, रोहन एडके आणि मुसा शिंदे यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्यांनी मुख्य सूत्रधार कुमार परदेशी याच्या सांगण्यावरून हा कट रचल्याची कबुली दिली. कोल कोलवडकर यांची गाडी रात्री बनावट चावीने उघडून, गाडीतील स्टेफनी काढून त्याजागी गांजा ठेवला आणि सीटवर पिस्तूल ठेवल्याचे त्यांनी सांगितले. या कामासाठी परदेशी यानेच त्यांना गांजा आणि पिस्तूल पुरवले होते.
या प्रकरणी पोलिसांनी कट रचणे, चोरी करणे यांसारखी कलमे लावली असून अटक केलेल्या पाच आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक आरोपी अनिल गजरे हा यापूर्वीच्या एका 'हनी ट्रॅप' प्रकरणातही फरारी होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोषी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. सुनील महाडीक व त्यांचे पथक करत आहे.