फलटण │ कामगार, शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांचे हक्क आणि न्यायासाठी गेली अनेक वर्षे झगडणाऱ्या कामगार संघर्ष संघटनेने आता थेट सत्तेच्या मार्गावर पाऊल टाकले आहे. सामाजिक परिवर्तनाचा दीप हातात घेत संघटनेने विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांसोबत युती करून आगामी नगर पालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती सुरजभाऊ भैलुमे, कामगार संघर्ष संघटना सातारा जिल्हा युथ अध्यक्ष यांनी दिली.
संघटनेचे पदाधिकारी म्हणतात, “आम्ही केवळ आंदोलनापुरते मर्यादित राहिलो नाही, तर आता विकासाच्या प्रक्रियेत थेट सहभागी होणार आहोत. नगरपालिकेत कामगार, शेतकरी आणि सामान्य जनतेचा आवाज बुलंद व्हावा, हीच आमची लढत आहे.”
या युतीचा उद्देश केवळ सत्ता नाही, तर जनतेच्या प्रश्नांवर आधारित प्रशासन उभारणे आहे. रोजगार, आरोग्य,विज,पाणी या मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे पदाधिकारी दिवस - रात्र काम करत असतात. फलटण नगर पालिका प्रभाग क्र 1, 2, 3, 5, 7, 10 या प्रभागात लढण्याचा निर्णय संघटनेने घेतला असून मतदार आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, अनेक तरुणांनी या चळवळीत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.
स्थानिक राजकारणात कामगार संघर्ष संघटनेच्या या निर्णयामुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे. “विकास, प्रामाणिकपणा आणि सर्वसमावेशक नेतृत्व” या घोषवाक्याने संघटनेने नगरपालिकेच्या रणांगणात पाऊल टाकले आहे.