पुणे:-
मालधक्का चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारासाठी ससुन रुग्णालयासमोरील व सांस्कृतिक भवनाला लागून असणारी सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा राज्य सरकारने द्यावी. भव्यदिव्य असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र या जागेवर उभारावे. राज्य-केंद्र सरकारने त्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी गुरूवारी (ता.१४) केली.राज्यासह देशभरातील आंबेडकरी जनता देखील या कार्यात हातभार लावेल.पुरोगामी महाराष्ट्रात महापुरूषांचा वैचारिक वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांच्या विचारांचा ठसा उमटवणारी मोठमोठी केंद्र उभारणे आवश्यक आहे, अशी बसपची भूमिका असल्याचे डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले.
मंगळवार पेठे येथील या भवनाच्या विस्तारीकरणासाठी जागा मिळावी, अशी मागणी आंबेडकरी चळवळीची होती. पंरतु, ही जागा खासगी बिल्डरला देण्याचा बेकायदेशीर निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीने याविरोधात १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता पुकारलेल्या 'ठिय्या' आंदोलनात बसपा सहभागी होईल, असे डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले. स्व.विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना त्यांनी संबंधित दोन एकरची जागा विस्तारीकरणासाठी देण्याचे आश्वासन दिले होते. पंरतु, दोन दशके उलटल्यानंतर देखील आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांना या आश्वासनाचा विसर पडला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा मुद्दा मार्गी लावतील, अशी अपेक्षा बसपची आहे.भवनाच्या विस्तारीकरणासाठी ही जागा सरकारने दिल्यास त्यावर भव्यदिव्य स्मारकासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्जित सर्वात मोठे ग्रंथालय तसेच डॉ.बाबासाहेबांच्या जीवनपट उलगडणारे संग्रहालय उभारले जावू शकते, असे डॉ.चलवादी म्हणाले. २० जुलै २००० रोजी ही जागा विस्तारीकरणासाठी देण्याचा ठराव पुणे मनपाच्या स्थायी समिती तसेच मुख्य सभेने मंजूर केला होता. पंरतु, या ४ सप्टेंबर २०२४ पासून ठरावाला बगल देत ही जागा ६० वर्षाच्या भाडेकरारावर बेकायदेशीररित्या खासगी व्यावसयिकाला देण्यात आली.
आता आंबेडकरी समाजाच्या आंदोलनाने राज्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासाठीच्या प्रत्येक आंदोलनाला बसपाचे समर्थन आहे.प्रत्यक्ष भवनाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू होईलपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला असल्याचे डॉ.चलवादींनी स्पष्ट केले.