दिवाळी
अर्थात् दीपोत्सव
दिवाळी असे दिव्यांचा उत्सव ,
अंधारावर प्रकाशाचा , वाईटावर चांगल्याचा असे हा विजयोत्सव,
नवी उमेद , नवे चैतन्य आणि नवी दिशा मिळे आपल्या सर्वांना,
एकोपा, प्रेम ,समृद्धी आणि आनंद पसरे दाही दिशांना!!
दिवाळी हा सण सर्वांनाच प्रिय आहे . तो सुरू झाला ते रावणाचा वध करून राम , सीतामाई आणि लक्ष्मण जेव्हा अयोध्येला परतले तेव्हा पासून त्यांच्या आगमनाखातर अयोध्ये मध्ये हा उत्सव साजरा करण्यास प्रारंभ झाला. त्यावेळी सर्व लोकांनी आपापल्या घरात , परसात , मंदिरात आणि जिथे शक्य असतील तिथे मातीचे दिवे आणि पणत्या लावून अग्नी देवतेची पूजा केली आणि हाच दीपोत्सव पुढे वाढत गेला आणि भारतातच न्हवे तर परदेशात जसे की बँकॉक , सिंगापूर, मलेशिया , हाँगकाँग, भूतान, नेपाळ, त्रिनिनाद आणि अजून बऱ्याच ठिकाणी हा सण उत्साहात साजरा होतो.
मिठाई , फराळ आणि गोड पदार्थ करणे आणि ते एकत्र येऊन खाणे यात काही वेगळीच मज्जा असते. शहरात तर सामूहिक कार्यक्रम जसे की दिवाळी पहाट , दिवाळी संध्या , नृत्य कला आणि गायन या सारखे उत्तम दर्जेदार कार्यक्रम आयोजित केले जातात .
फटाके उडविण्यास कधी सुरुवात झाली हे निश्चितपणे सांगता येणार नाही पण लहानपणी हे एक महत्त्वाचे आकर्षण जरूर असे.
सध्याची दिवाळी आणि पूर्वीची दिवाळी यात काय फरक झाला आहे ते आता जरा बघुयात.
पूर्वीची दिवाळी ......
छानशी गुलाबी आणि थोडी बोचरी थंडी असायची.
घरात सगळे नातेवाईक , सगे सोयरे , काका , मामा , दादा ,ताई , आप्पा , आण्णा , तात्या, मावशी असे सगळे एकत्र यायचे आणि ते ही आवर्जून .
लहान , मोठे आणि थोर मंडळी एकमेकांशी गप्पा गोष्टी ,विचारांची देवाणघेवाण करीत असतं.
घराची साफसफाई करून घर नीट नेटके लावणे , सकाळी नरकचतुर्दशी ला अभ्यंग स्नान करून नवीन कपडे घालून गावातल्या मंदिरात जाऊन मग एकत्र जमून दिवाळीचा फराळ करणे यात काही वेगळीच अनुभूती होती.
लहान मुलांना किल्ला करणे , त्याचावर गहू, मोहरी आणि कोथिंबीर पेरून ती उगवून आणणे, मावळे , मावळीणी , सिंह , मारुती या सर्वांना बसवले की मग शिवाजी महाराजांना गडावर वरच्या बाजूला स्थानापन्न करणे असा बाळ गोपळांचा कार्यक्रम असे.
नवीन कपडे , फटाके , नवीन प्रेरणा , नवीन चैतन्य आणि एक कमालीचा उत्साह घरा घरात दिसत असे .
हा दिवाळीचा उत्सव ४ ते ५ दिवस चालत असे आणि तो कधी संपूच नये असे वाटे.
आता काय बदलले आहे .......
आताची दिवाळी ही जास्त तांत्रिक आणि कृत्रिम झाली आहे असे नाही का वाटत .
टेक्नॉलॉजी च्या युगात आणि मोबाईलच्या जगात आपल्या भावना आपण मेसेज द्वारे पाठवतो खरे पण त्यात खऱ्या भावना किती असतात् हे प्रत्येकाने जाणणे गरजेचे आहे .
अभ्यंगस्नान हे काय असते हे तरुण पिढीला माहीतच नाही .
उटणे आणि तेल लावणे तर त्यांना किळसवाणे वाटते.
एकोप्याची आणि सामाजिक बांधिलकीची भावना कुठेतरी लोप पावत चालली आहे .
एकत्र येऊन कुटुंबासोबत मनमुराद आनंद लुटणे हा प्रकार हळू हळू कमी होत चालला आहे . एकदा का फराळाचे दिवाळी गिफ्ट हांफर आणि शुभेच्छा पाठवल्या की भेटण्याचा प्रश्नच उरत नाही .
एकंदरीत काय तर पूर्वीचा उत्साह , चैतन्य , एकोपा कुठेतरी हरवत चालला आहे असे नक्कीच वाटते .
तर प्रियजन हो,
अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे" प्रतीक असे आपली दिवाळी,
एकोपा , चैतन्य , परोपकार , आपुलकी आणि जिव्हाळा या गुणांची होऊ देत मांदियाळी,
जरी आपण जगत आहोत कलियुगात विसरू नका पूर्व परंपरेचा सोहळा,
दिवाळीचे सर्व सण करा साजरे मनापासून म्हणजेच तो उत्सव होईल अगळा वेगळा
रमा एकादशीची भक्ती
वसुबारस चे वात्सल्य
धनत्रोदशीची संपत्ती
नरकचतुर्दशी ची शक्ती
लक्ष्मीपूजनाचे वैभव
पाडव्या चे भरभरून प्रेम
भाऊबीजेच्या जिव्हाळ्याने
ही दिवाळी संपन्न होवो.
दिवाळीच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा
डॉ प्रसाद जोशी ,डॉ प्राची जोशी,
जोशी हॉस्पिटल प्रा ली. फलटण.