नोकिया चे मोठ्ठे आणि जड मोबाईल आले, मग साधे छोटे मोबाईल आले आणि आता तर स्मार्ट फोन चां सुळसुळाटच दिसतो. काहीकाही वेळा त्या स्मार्ट फोन मधील कितीतरी फिचर्स आपण वापरत पण नाही आणि ती आपल्याला माहीत पण नसतात.
टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान) च्या जगात आम्ही अडकलोय पार!
आहारी न जाता, कामापुरतेच वापर ना यार!!
वरून दिसतोय नुसताच की हो झगमगाट !!!
आरोग्याची तर लागलिये पुरतीच की हो वाट!!!!
सध्याचे जग टेक्नॉलॉजीचेच आहे. नवीन नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होते आहे आणि आपण त्याच्या आहारी जात आहोत.
मला आठवतं आहे की 1998 साली पेजर ची टेक्नॉलॉजी आली, मग नोकिया चे मोठ्ठे आणि जड मोबाईल आले, मग साधे छोटे मोबाईल आले आणि आता तर स्मार्ट फोन चां सुळसुळाटच दिसतो. काहीकाही वेळा त्या स्मार्ट फोन मधील कितीतरी फिचर्स आपण वापरत पण नाही आणि ती आपल्याला माहीत पण नसतात.
ह्या सर्व टेक्नॉलॉजीचा कसा आणि किती वापर करावा हे खरंच अजून आपल्याला कळले आहे का ?
टेक्नॉलॉजी चां सूयोग्य वापर कसा करावा ?
1.सगळ्यात पहिलं म्हणजे आपण हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे की टेक्नॉलॉजी ही आपल्यासाठी आहे, आपण त्या साठी नाही .
माणसाने त्याच्या बुद्धी ने तिचा शोध लावला आहे त्यामुळे त्याने (माणसाने) ती आपल्याला डोईजड होणार नाहीना या कडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
2.दुसरा मुद्दा टेक्नॉलॉजी ही आपल्या उन्नती साठी आहे ना की अधोगती साठी. आहारी गेलं की विनाश हा अटळच आहे.
3. टेक्नॉलॉजी मुळे जसे फायदे होतात तसे तोटे ही खूप आहेत. गुगल बाबांना तर जगातलं सर्व काही माहिती आहे. काहीवेळा अज्ञानात सुख असतं असं म्हणतात, अनावश्यक गोष्टींचे अर्धवट ज्ञान वाईटच. त्यांनी गैरसमज नक्कीच वाढीला लागतात आणि त्याचे दुष्परिणाम आपण भोगतोच आहोत.
4.टेक्नॉलॉजी मुळे मनुष्याची बुद्धी उंचावत चालली आहे पण त्याचे आरोग्य मात्र वेशीवर टांगले गेले आहे हेही तितकेच खरे.
काय आहेत टेक्नॉलॉजी च्या दुरुपयोगा मुळे होणारे आजार ?
1. सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि तो ही स्मार्ट मोबाईल.
सतत मोबाईल च्या वापरा मुळे मानेचे, कंबरेचे, डोळ्यांचे आणि मानसिक आजार बळावले आहेत. मनुष्या मधला संवाद कुठे तरी हरवला आहे. सर्व जग आभासी बनले आहे.
‘भावना ’ ही वरवरच्या झाल्या आहेत. मोबाईलचे व्यसन ही मोठी समस्या होऊन बसली आहे.
माझ्याकडे किती तरी तरुण मुलं मुली पेशंट म्हणून येतात की ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, मणक्यांचे आजार, मानसिक ताण हे सर्व आजार लहान वयातच होत आहेत.
2.कॉम्प्युटर समोर जे तासनतास बसतात अर्थात त्यांचे कामचं ते आहे पण वरील सर्व आजार हे त्यांना होताना दिसत आहेत. मान दुखी, कंबर दुखी आणि मणक्यांची झीज ही तर खूपच कॉमन होऊन बसली आहे.
स्थूल पणा हा पण त्यामुळे वाढीला लागला आहे. लठ्ठ पणा वाढला की बाकीचे आजार हे त्यापाठोपाठ आलेच म्हणून समजा .
3. खूप वेळ एका जागी बसून राहिल्यामुळे शारीरिक क्षमतेचा र्हास होऊ लागला आहे. पूर्वी 100किलो वजनाची पोती उचलणारी माणसे सहज दिसायची, आता 20 किलोचं ठिकं सुद्धा उचलताना फे फे उडते.
4. नवीन टेक्नॉलॉजी च्या नावाखाली लाईफ स्टाईल पण पार बदलून गेली आहे. उशिरा उठणे, रात्री उशिरा झोपणे, तासनतास एका जागी बसणे आणि मग ताण तणावा मुळे व्यसनाधीन होणे. हे चक्र विनाशा कडेच घेऊन जाणारे आहे यात काही शंकाच नाही .
5. अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तर आपण मूळ उदिष्टा पासून या भौतिक जगात पार गुरफटून गेलो आहोत.
‘मनुष्य’ विश्वा मधून स्वर्गीय विश्वा कडे न जाता आपण परत ‘प्राणी’ विश्वाकडे या टेक्नॉलॉजी मुळे वाटचाल करत आहोत. आणि हे मनुष्य जातीला घातक आहे.
आता मग हे टाळायचे कसे ?
आणि खरंच टेक्नॉलॉजीचा वापर किती आणि कसा करावा ?
टेक्नॉलॉजी हे आपल्याला मिळालेले एक वरदान आहे. त्याचा कामा पुरता आणि सुयोग्य वापर ह्यातच आपले हित आहे. लवकर झोपे आणि लवकर उठे हे अंगिकारले पाहिजे. त्याने शरीराला व्यवस्थे मध्ये येण्यास मदत होईल आणि पचन संस्थाही सुधारेल.
- रोजचा स्वतः साठी अर्धा ते एक तास व्यायाम हा झालाच पाहिजे. मग तो कोणताही असेल. चालणे, योगा, पोहणे, पळणे, मैदानी खेळ, सायकलींग असेच अनेक व्यायामांनी शरीराची मशागात होते. स्नायूंना बळकटी येते. संध्यांना वंगण आणि पोषण मिळते आणि शरीर सुदृढ आणि निरोगी राहण्यास नक्कीच मदत होते.
- आहार हा सकस, सात्विक आणि घरचाच असावा.
जंक फूडस् , कोड्रिंक्स ही शक्यतो टाळावीत.
- पाणी भरपूर प्या . साधारण दोन ते तीन लिटर दिवसातून कमीतकमी.
- मोबाईल किंवा लॅपटॉप वर काम करण्याच्या किंवा टाईमपास करण्याच्या वेळा पक्क्या कराव्यात. म्हणजे स्वतः कडे आणि आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल .
- छंद जोपासा मग तो कुठलाही असो . म्हातारंपणी तोच तुमची साथ नक्की सोडणार नाही .
- सात ते आठ तास शांत झोप शरीराला फार आवश्यक आहे . रात्री झोपताना मोबाईल शक्यतो जवळ नसावाच.
तर प्रियजन हो,
करा टेक्नॉलॉजीचा योग्य वापर,
द्या स्वतःला पुरेसा वेळ वरचेवर,
आजार जातील पळून दूरवर ,
आयुष्य होईल निरोगी, सुदृढ आणि अतिशय सुंदर !!
डॉ. प्रसाद जोशी
अस्थिरोग शल्य चिकित्सक
जोशी हॉस्पिटल प्रा.लि.फलटण.