शरद पवार यांच्या मुंबई येथील घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ फलटण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक ९ रोजी निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान राष्ट्रवादीच्या वतीने फलटण बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला फलटणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोर्चाद्वारे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले
फलटण : शरद पवार यांच्या मुंबई येथील घरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ फलटण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक ९ रोजी निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान राष्ट्रवादीच्या वतीने फलटण बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला फलटणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोर्चाद्वारे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निषेध सभास्थानी विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपक चव्हाण, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्मा भोसले, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या लतिका अनपट, राजश्री शिंदे, डि के पवार, विलास नलवडे, नितीन भोसले (भैया) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार दिपक चव्हाण, संजीवराजे नाईक-निंबाळकर, सुभाषराव शिंदे यांनी शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करीत म्हणाले यापुढे अशी कृती करणाऱ्याला जशाच तसे उत्तर देऊ. घरावरील हल्ला हा पुरोगामी महाराष्ट्रावरील हल्ला आहे. यापूर्वी अशा घटना घडत नव्हत्या. केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून जाती धर्मात तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशांत महाराष्ट्र करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे. पवार यांच्या घरावरील हल्ल्याची घटना निंदनीय आहे. देशात लोकशाही आहे. जर कुणी लोकशाही उध्वस्थ करण्याच्या प्रयत्न करणार असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. शरद पवार साहेबांचे राज्य आणि देशाच्या विकासात फार मोठे योगदान आहे हे भाजप वाल्यांनी विसरू नये. सत्तेचा दुरुपयोग करून राज्य सरकारला ईडीची भिती दाखवण्याचे उद्योग आता महाराष्ट्र सहन करणार नाही. अशा तीव्र शब्दात आयोजित सभेत निषेध व्यक्त करण्यात आला.
निषेध सभेनंतर विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे-नाईक निंबाळकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, यापूर्वी अशा घटना कधीच घडल्या नव्हत्या. घडलेली घटना योग्य नसल्याचे सांगत एसटी कामगार संघटनेचा संप व आंदोलन नेतृत्वहीन असून वकील पैसे घेऊन काम करीत असल्याचे गेली कित्येक वर्षे मी पाहत आलो आहे. देशातील प्रत्येक चिघळणारा प्रश्न शरद पवार साहेबांसोबत जोडला जात आहे. हल्ला करणे हि कोणती संस्कृती आहे. जातीय धार्मिक दंगली भडकवणे हि समाज स्वास्थ बिघडविण्यासाठी धोक्याची घंटा आह. याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. राजकीय इतिहासात अनेकांनी आंदोलने केली मात्र एखाद्याच्या घरावर जाऊन हल्ले केले नाहीत. लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने आंदोलने व्हावीत मात्र घडलेली घटना निषेधार्ह असल्याचे श्रीमंत रामराजे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान श्रीमंत रामराजे यांच्या निवास्थानी झालेल्या सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी फलटण बंदचे आवाहन केल्यानंतर फलटण बंदला फलटण मधील व्यापाऱ्यांनी चांगलl प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे, सुभाषराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा काढून मोर्चेकऱ्यांच्या वतीने प्रांत आधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल यांना निवेदन पाठविण्यात आले.