फलटण प्रतिनीधी :- वाखरी ता. फलटण येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल या शाळेची मोठी दुरावस्था झाली असून यास संस्थाचालक जबाबदार असून संस्थाचालकांनी लवकरच शाळेची नवीन इमारत न बांधल्यास संस्थाचालकांनी शाळेकडे दुर्लक्ष केल्यास नामांकित इतर शालेय संस्थेंना गावात शाळा चालविण्यासाठी आमंत्रित करू असा इशारा सरपंच शुभांगी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
वाखरी ग्रामपंचायत मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सरपंच शुभांगी शिंदे बोलत होत्या. यावेळी तुकाराम शिंदे, उपसरपंच गणपत मोहिते, वाखरी सोसायटीचे चेअरमन दादा ढेकळे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष ढेकळे, वाखरी ग्रामस्थ उपस्थित होते.वाखरी ता. फलटण येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल या शाळेची इमारत जुनी झाली असून शाळेची अवस्था धोकादायक झाली आहे.
मारुती मंदिरात काही वर्ग सुरू असून काही वर्ग लक्ष्मीआई मंदिरात सुरू आहेत मागील वर्षी शाळेची पटसंख्या २१५ होती ती चालू वर्षी १८५ झाली आहे. जुन्या शाळेत ५ ते १० वी चे चालू ४ वर्ग सुरू आहेत. शाळेची इमारत धोकेदायक झाल्याने अनेक विद्यार्थी शाळेत येत नसून पालकांनाही शाळेत जाणाऱ्या मुलांची धास्ती लागून राहत आहे. अनेक पालकांनी त्यांची मुले वाखरीच्या शाळेतून काढून इतरत्र शाळेत घातली आहेत.
वाखरी ग्रामस्थांनी लोकवर्गणी व श्रमदान करून वाखरीतील छत्रपती शिवाजी हायस्कूलची स्थापना सन १९६२ साली केली. दगड, माती, यामध्ये बांधकाम करण्यात आलेल्या या शाळेच्या इमारतीचे बांधकाम ५० वर्षानंतर धोकादायक अवस्थेत आहे. संस्थेचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक यांना वारंवार सांगूनसुद्धा संस्था इमारत दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. संस्थाचालक स्थानीक ग्रामपंचायत सदस्य अथवा ग्रामस्थांशी याविषयी चर्चा करत नसल्याने शाळेचा प्रश्न असाच कित्येक वर्ष प्रलंबित आहे असे शुभांगी शिंदे यांनी सांगितले
शाळेच्या इमारतीची पडझड झाल्याने गावातील मंदिरात एक वर्ग, समाजमंदिरात एक वर्ग व पडायला आलेली शाळा यामध्ये चार वर्ग सुरू आहेत. मोठा पाऊस आल्यास माळीन व इर्शाळवाडी सारखी दुर्घटना घडू शकते. शाळेच्या धोकादायक इमारती विषयी विशेष ग्रामसभा बोलावून ठरावही घेण्यात आले आहेत. संस्थाचालक शाळेच्या इमारतीकडे दुर्लक्ष करत असतील नामांकित इतर शालेय संस्थेंना गावात शाळा चालविण्यासाठी आमंत्रित करू असा इशारा शुभांगी शिंदे यांनी दिला.