फलटण प्रतिनिधी -
बारामती कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांनी ढवळ (ता. फलटण) येथे शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्त्व व पद्धती याबाबत प्रत्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. या उपक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) अंतर्गत मुक्कामी असलेल्या कृषीदूतांनी शेतकऱ्यांना बियाण्यांची शुद्धता, फवारणीद्वारे बीज प्रक्रिया, औषधांचे प्रमाण व योग्य वेळ याबाबत सविस्तर माहिती दिली.
बीज प्रक्रिया केल्यास पिकांमध्ये रोग व कीड यांचा प्रादुर्भाव कमी होतो तसेच उत्पादन क्षमता वाढते असे कृषीदूतांनी प्रत्यक्ष प्रयोगातून दाखवून दिले.
या उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. एस. पी. गायकवाड व प्रा. एस. व्ही. बुरुंगळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. बीज प्रक्रियेविषयीचे प्रात्यक्षिक पाहून अनेक शेतकऱ्यांनी हंगामातील बियाणे प्रक्रिया करून घेण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य, जि. प. शाळेचे शिक्षक तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.