फलटण प्रतिनिधी -
फलटण येथे दोन दिवसा पूर्वी पत्रकार परिषद घेऊन आमदार दिपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरातील विकास कामांची यादी वाचली. वास्तविक ३० वर्षे झोपा काढलेल्या फलटणच्या राज्यकर्त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विकास कामांची धडकी घेतली असल्यानेच टेंडर नसलेल्या कामांचे भूमिपूजन होत असल्याचा उपरोधीक टोला फलटणचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी काढलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात लगावला आहे.
या प्रसिद्धीपत्रकात पुढे असे म्हटले आहे की, गेली 30 वर्षे झोपलेले नेते आज जागे झाले आहेत आणि कामांच्या मंजुरीच्या जोरावर भूमिपूजनाचा घाट घातलेला आहे असे समजते आहे. अशी वेळ तुमच्यावर का आली याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे असा सल्ला अशोकराव जाधव यांनी विरोधकांना दिला आहे. तर फलटण शहरातील जनतेला कायम गृहीत धरून चालणाऱ्या नेत्यांना या आधी विकास कामे का सुचली नाहीत आणि ज्या कामांची टेंडर प्रोसेस नाही, वर्क ऑर्डर नाही अशा कामांची भूमिपूजन घेणे म्हणजे फलटणकरांची शुद्ध फसवणूक आहे हे नकळण्या सारखी फलटणकर जनता अडाणी नाही असे सूचक विधान जाधव यांनी या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केले आहे.
मलठण मध्ये गेली 7 वर्षांत 1 रुपयाही विकास कामांसाठी न टाकणाऱ्या व मंजूर असलेली कामे जिल्हाधिकारी यांचे कडून रद्द करून आणणाऱ्या राजे गटाच्या स्वीकृत नगरसेवक यास आज मलठण ची आठवण झाली का? असा सवाल उपस्थित करून तुमचा हिशोब फलटणची जनता आता निवडणुकीत करणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पण अशा बेकायदेशीर भूमिपुजनास जनता आता भूलनार नाही व अशा भूमिपूजनास जनताच विरोध करेल तर सत्ताधाऱ्यांच्या पाया खालची वाळू सरकलेली आहे हेच या वरुन दिसत असल्याचा टोलाही शेवटी अशोकराव जाधव यांनी लगावला आहे.