फलटण प्रतिनिधी :
बौद्ध धम्मातील परंपरेप्रमाणे वर्षावास कार्यक्रमास सातारा (पूर्व ) जिल्ह्यात समाज बांधवांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे सातारा (पूर्व ) अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य श्रीमंत घोरपडे यांनी दिली. सातारा (पूर्व )जिल्ह्यातील फलटण, कोरेगाव, खंडाळा, माण, व खटाव या तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून मोठया प्रमाणात धम्म कार्य सुरु असल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
फलटण तालुक्यातील पिंपरद, समतानगर, निरगुडी, जिंती व मिरगाव या ५ गावामध्ये तालुकाध्यक्ष महावीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षावासाच्या कार्यक्रम सुरू आहेत. तर कोरेगाव तालुका अध्यक्ष मिलिंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली २२ गावांमध्ये फिरते कार्यक्रम सुरू आहेत.
खंडाळा तालुका अध्यक्ष यशवंत खुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध गावांमध्ये चला बुद्ध विहारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावोगावी धम्मकार्य सुरू आहे. लोणंद याठिकाणी भन्ते धम्मानंद यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मकार्य होत आहे. माण तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ गावात वर्षावास तर १० गावात फिरते धम्मकार्यक्रम सुरु आहेत. खटाव तालुकाध्यक्ष बबनराव जगताप याच्या माध्यमातून 3 गावात वर्षावास तर इतर दर रविवारी विविध गावात कार्यक्रम सुरु असल्याची माहिती घोरपडे यांनी दिली.
वर्षावास परंपरेला बौद्ध धम्मामध्ये अतिशय महत्व असून ही बुध्दकाळापासून चालत आलेली परंपरा आहे. याचे महत्व स्वतः तथागत भगवान बुध्द यांनी अनेक ठिकाणी वर्षावास करून पुजनीय भिक्खू संघ व श्रद्धावान उपासकांच्या समोर आदर्श ठेवले आहे. आषाढ पौर्णिमेला जगभरातील पुजनीय भिक्खू संघाकडून वर्षावासाला प्रारंभ करण्यात येतो. ह्या वर्षावासाचा कालावधी हा आषाढ ते आश्विन असा तिन महिन्याचा असतो. त्यामुळे तिन महिने सर्वत्र प्रत्येक बुध्दविहारात विपश्यना( ध्यानसाधना),त्रिरत्न वंदना, परित्राणपाठ,धम्मदेसना, बुध्द आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथाचे वाचन, उपोसथ आदी. कृतिकार्यक्रम सुरु करण्यात येतात.
भारतीय बौद्ध महासभेची सभासद नोंदणी सुरु असून समाज बांधवानी करून धम्म कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी प्राचार्य श्रीमंत घोरपडे यांनी केले आहे.