फलटण : सचिन मोरे
सध्या फलटण मधील अनेक व्हाट्सअप ग्रुप वर एक मेसेज खूपच व्हायरल होतोय. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पत्रकारांनी रोजंदारीवर काम करावे असा काहीसा त्या व्हायरल पोस्टचा अर्थ आहे. माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पत्रकारांचा एमपी ग्रुप तर राजे गटाच्या राजे प्रेस ग्रुप व इतर अनेक व्हाट्सअ ग्रुपला हा मेसेज चांगलाच व्हायरल होतोय. हा मेसेज फलटण येथील स्थानिक वाहिनीच्या एका पत्रकारांने पोस्ट केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माध्यम प्रतिनिधी कायमच जागरूकपणे वार्तांकन करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून विविध पक्ष कार्यालय वा पक्षाची पदाधिकारी यांच्याशी संबंध येत असतो.
वास्तविक पक्षाची अधिकृत जाहिरात हा एक भाग असतो. मात्र त्या पत्रकारांनी विशिष्ट एका पक्षासाठी रोजंदारीवर काम करा असा सल्ला देणे, म्हणजे त्या पत्रकारितेचा अपमान होय असे फलटण येथील स्थानिक ज्येष्ठ पत्रकारांनी सांगितले. सदर व्हायरल पोस्ट मध्ये असे लिहिले आहे की, "AC मधे बसून काही राजकीय ऑफिस मधे नेमलेले स्वतःला अती शहाणे समजणारे महाशय पत्रकारांची करतायेत चेस्टा , रोजंदारीवर काम करा म्हणणाऱ्याचा लवकरच भांडाफोड" , अशी पोस्ट करण्यात आली आहे.
टिचभर कामासाठी वितभर बातमीच्या प्रसिद्धीकरिता सदरची बातमी घ्या, अशी पत्रकारांना विनंती करणारे अनेक राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी मात्र या प्रसंगांनंतर चोरून दूध पिऊन डोळे मिटून गप्प बसणाऱ्या बोक्यासारखे फोन न उचलता गप्पच आहेत. मात्र फलटण येथील स्थानिक पत्रकारांचा अपमान करणाऱ्यांना या लोकसभा निवडणुकीत त्याची किंमत मोजावी लागेल का? हे येणारा काळच ठरवेलच.
अहमदनगर येथे काही महिन्यापूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबद्दल दिलेल्या ‘कानमंत्रा’ची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती. "ज्या बूथवर तुम्ही काम कराल, तेथील पत्रकारांची यादी तयार करा, महाविजय 2024 पर्यंत आपल्याविरोधात काही येणार नाही, याची काळजी घ्या. या पत्रकारांना महिन्यातून धाब्यावर न्या, एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे हे समजले असेल," असा सल्ला बावनकुळे यांनी दिला होता यावर संपूर्ण राज्यातून बावनकुळे यांच्या वर पत्रकारांनी टिकेची झोड उठवली होती. एकंदरीतच त्यामुळे या दोन्ही घटना पत्रकार विसरणार नाहीत हे मात्र नक्की.