देशातील विविध महापुरुषांनी भारतीय म्हणून काम केले मात्र देशातील विविध जाती समूहांनी त्यांना जाती बंदिस्त केले. आजही विविध जाती समुहाच्या बैठक होताना दिसतात या सर्व घडामोडी देशाची एकता भंग करणाऱ्या आहेत जातीयवादाचे चित्र अलीकडे गडद होताना दिसत आहे. त्यामुळे जातीयवादाचे विष सर्वांनी एकत्र येऊन मातीत गाढा असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले, ते फलटण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव यात्रेनिमित्त आयोजित सभेत बोलत होते.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड.नरसिंह निकम, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजपा फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे मा. पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, सुशांत निंबाळकर, अमोल सस्ते, प्रा.रवींद्र कोकरे, महिला आघाडीच्या सौ उषा राऊत, जिल्हा सरचिटणीस सौ. मुक्ती राहुल शहा, माजी नगरसेवक बाळासाहेब भोसले, अशोकराव जाधव, सचिन अहिवळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. रणजितसिंह ना. निंबाळकर म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर अस्पृश्यता मिटवणारे व विज्ञानवादी होते. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे सावरकर यांच्यावर काही लोक टिका करतात मात्र त्यांनी पहिल्यांदा अभ्यास करावा व नंतर बोलावे. अलीकडच्या काळामध्ये विविध समाजामध्ये गट निर्माण व्हायला लागले आहेत त्याचा परिणाम समाज दुभंगतेकडे होऊ लागला असून कोणत्याही धर्माने जातीवाद शिकवला नाही विविध जाती,धर्म,पंथ देशात गुण्या गोविंदाणे नांदले पाहिजेत अशी अपेक्षा खा. रणजितसिंह यांनी यावेळी व्यक्त केली.
कोणत्याही घटकाने जातीयवाद मुळात माणूच नये यातून भारतीयांचे एकीकरण होण्यास मदतच होणार आहे. विविध समाजातील वाद देशाची एकता व अखंडतेला मारक असल्याचे प्रतिपादन खा. निंबाळकर यांनी केले. समाजाच्या नावाने राजकारण करणाऱ्याला बाजूला ठेवणे ही आजची गरज बनली आहे. विविध जाती समूहाच्या मागे राहून राजकीय स्वार्थ साधनाऱ्या राज्यकर्त्यांनी जातीयवाद निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे असे आवाहन यावेळी खासदार निंबाळकर यांनी केले.
सध्या देशात भाजपाचे सरकार आहे. आपण आपल्या भागात अनेक कोटींचा निधी आणला आहे. विविध समाजातील घटकांना याचा लाभ होतो. विकास प्रक्रियेमध्ये कोणताही समाज मध्ये न आणता सर्वांगीण विकास ही आपली मनापासूनची धारणा असून केंद्राच्या माध्यमातून आपल्या भागासाठी रोज कोठ्यावधींचा निधी येत आहे. सर्वांचा विकास हाच आपला ध्यास असल्याचा संकल्प आपण केला असल्याचे खासदार रणजितसिंह यांनी सांगितले. आज समाजातील विविध घटक आपली ओळख करून देत असताना मी या जातीचा मी त्या धर्माचा असे अभिमानाने सांगत असल्याचे चित्र दिसत आहे मात्र देशातील समाजातील सर्व घटकांनी भारतीय म्हणूनच आपली ओळख दिली पाहिजे अशी अपेक्षा खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रा. रवींद्र कोकरे यांनी स्वातंत्रवीर सावरकरांचे जीवन चरित्र आपल्या भाषणातून उलगडून दाखविले. ॲड. नरसिंह निकम, जयकुमार शिंदे, डॉ. प्रवीण आगवने, संतोष सावंत यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मलठण येथील शंभू महादेवाच्या मंदिरापासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेस खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश जंगम यांनी केले तर आभार भाजपा शहराध्यक्ष अमोल सस्ते यांनी मानले.