गरिबी आणि जातीयवाद याच्या भोवरयात गटांगळ्या खाणारया
बाल जीवाला,तू धरायला लावलेस पायाचे अंगठे
अन इकडे तिकडे हलतो म्हणून सपासप केले पाठीत वार ,
शेजारच्या संडासातून आलेली दुर्गंधी घेत
समजून गेलो की इथे नाही माणुसकी
माणसात असलेल्या लांडग्यांची जगात गर्दी आहे फार !
बालभारतीतील पोरगी अन पोरगा कधीच झालो नाही आम्ही
पत्त्याच्या पाने खेळणाऱ्या विद्वानांनी शिकवली तिरीट,रमी
कपाळावरून मागे सरकत जाणारया टकलावरून तुला ठरविले कुणी बुद्धिमान
तरी तू शिक्षक नव्हतास,तू होतास हैवान !
प्रेमाने पोटाशी धरण्याऐवजी तू दिलास आम्हाला मागचा बेंच
अन खिदळत राहिलास पुढच्या बेंचशी जातीचे हुशार बछडे घेऊन
ही कसली शाळा ? हे तर राजकारणाचे अड्डे ,
हे सुधारणेचे नाव नव्हतेच मुळी,हे हुकुमतीने वाळू
घातलेले माणुसकीचे मढे !
कळण्याच्या वयात ढ म्हणून पडले काठीचे वार
अजूनही सूज जात नाही,किती जण झाले असतील बेजार
तरीही घेत होतास ,हसत हसत पगार ....
शाळा सोडून गेले किती, कुणीच करत नव्हते विचार
सालगडी मिळाला ,गाव कठ्ठ्यावर बसून दिले कामाचे इसार
शाळेतल्या पोरी लगीन करून गेल्या, झाल्या गुमनाम
दोन चार गाढवे शाळेभोवती ,फुर फुर करत उकिरंडयावर करती काम
दारूत बुडाले काहीजण..काही ड्रायव्हर झाले ..
देश चालवायचे शिक्षण आता ,केवळ पुढाऱ्यांचे झाले ?
एकनिष्ठपणे म्हणेल तशी हमाली करा ,नाहीतर कुठेही मरा ..
झाडी,डोंगर ,हॉटेल सारे पैसेवाल्यांचे झाले !
बेरोजगार झालेल्या अनेक जीवाना आठवतात अजून शाळेतले दिवस
उपहास करून कुणी कसे टाकले काळवंडून टाकले गरीबांचे दिवस ?
कवी - डॉ. सुभाष वाघमारे, सातारा.