जयंती महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यश्लोक श्रीमंत राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये महेश्वर येथील राजवाड्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात येणार असून होळकर चौकाची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे.
फलटण दि. 3 पुण्यश्लोक श्रीमंत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा 297 वा जयंती महोत्सव रविवार दि. 5 जून रोजी फलटण येथे विविध कार्यक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात होणार असल्याची माहिती सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे. जयंती महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यश्लोक श्रीमंत राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये महेश्वर येथील राजवाड्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात येणार असून होळकर चौकाची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. रविवार, दि. 5 रोजी सकाळी 9 वाजता पुण्यश्लोक श्रीमंत राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिमेचे पूजन करण्यात येणार असून सायंकाळी ठीक 5 वाजता महाराष्ट्र विधान परिषद सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भव्य मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी आ.दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्य विशेषतः धनगरी गजी नृत्य, ढोल ताशे, झांज पथक, शिंगाडे, पुण्याचा प्रसिद्ध ओंकार डी.जे. आणि उंट, घोडे यांचा समावेश करण्यात येणार असून पुण्यश्लोक श्रीमंत अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेची व विचारांची मिरवणूक फलटण शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात येणार आहे स्त्री पुरुष सर्व समाज बांधवांसह फलटण शहर व तालुक्यातील आणि तरुणांनी या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.