( मुंबई - कैलास पाफाळे यांचेकडून )
माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीची उमेदवारी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर झाली आहे. मात्र माढ्यातील राजकीय संघर्ष अजूनही मिटायचे नाव घेत नाही. मात्र नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर माढा लोकसभा मतदारसंघाविषयी बैठक घेतली. या बैठकीमधून मोहिते - पाटील विरहित माढा लोकसभेचे जागा जिंकण्याची रणनीती आखली असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माणचे आमदार जयकुमार गोरे, संजयमामा शिंदे यांच्यासह माढा मतदार संघातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
2009 व 2014 या दोन्ही वेळी माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळाले होते. यावेळी अनुक्रमे शरद पवार व विजयसिंह मोहिते - पाटील हे विजयी झाले होते. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर विजय झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून संबोधला जाणारा माढा मतदारसंघ पहिल्यांदाच भाजपाने जिंकला होता.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय गणिते बदलली. महायुतीतून भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला हा मतदारसंघ गेल्याने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरच पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माजी उपमुख्यमंत्री व भाजपा नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनीच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने माढा लोकसभा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे.
त्यातच आता खासदार शरद पवार यांनी माढ्यासाठी राजकीय हालचाली सुरू केल्याने महाविकास आघाडी कडून धैर्यशील मोहिते पाटील किंवा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाची चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र धैर्यशील मोहिते - पाटील हेच लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतात अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत.तर रामराजे नाईक निंबाळकर यांचा गट पुन्हा एकदा खासदार शरद पवार यांच्याबरोबर महाविकास आघाडी मध्ये सामील होईल असे बोलले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर या निवासस्थानी माढा लोकसभा मतदारसंघाविषयी तातडीची बैठक घेत नवी राजकीय समीकरणे मांडत माढ्या मधून विजयासाठी कंबर कसल्याचे बोलले जात आहे.