फलटण : सचिन मोरे
आगामी लोकसभा निवडणूकीचा बिगुल वाजला असून प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. माढा लोकसभा मतदार संघात महायुती कडून भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहिर झाली असली तरीही माढ्याचा तिढा अजून कायमच असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्याला कारणही तसेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांची भेट शिवरत्न बंगला अर्थात मोहिते पाटलांचे निवासस्थानी नुकतीच झाली. त्यानंतर रामराजे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवास्थानी घेतलेली भेट व तदनंतर व्हाट्सअप स्टेटस च्या माध्यमातून आपली भूमिका कार्यकर्त्यांची विचार - विनिमय करुन ठरवणार असल्याचे सांगून पुन्हा एकदा नवा संभ्रम निर्माण केला आहे.
खा. रणजित यांच्या विरोधात माढ्यात नवी राजकीय रणनीती ?
गेली 32 वर्षाहून अधिक काळ फलटण तालुक्यात रामराजे यांची एकहाती सत्ता आहे. तर सातारा जिल्ह्यातील राजकारणामध्ये रामराजे यांना विशेष महत्व आहे. तीन दशके राजकारण असूनही रामराजे यांना लोकसभेच्या माध्यमातून संसदेत जाण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत त्यांच्या मनात कायमच राहिली असेल. तर दुसरीकडे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांनीही पुन्हा एकदा जनतेतून निवडून येण्यासाठी लोकसभा हा एकमेव पर्याय असल्याने त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे खासदार रणजित यांच्या विरोधात माढ्यात नवी राजकीय रणनीती सुरु झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
नाईक निंबाळकर ; मोहिते -पाटील यांच्या अस्तित्वाची लढाई
फलटण तालुक्यात रामराजे यांची एकहाती सत्ता आहे. मात्र त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी व भाजपाचे माढा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करण्याची वेळ युती धर्मामुळे रामराजे यांच्यावर आली आहे. भाजप उमेदवार रणजितसिंह यांना मदत केल्यास भविष्यातील फलटण तालुक्यातील राजकारणासाठी
मोठा धोका होऊ शकतो हे रामराजे जाणून आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला रामराजे गटाचा विरोध असल्याचे आज फलटण येथे आमदार दिपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांच्या समवेत झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलले गेलेचे सांगितले जाते. त्यामुळे रामराजे उद्या कार्यकर्त्यांची विचार विनिमय करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात असले तरीही खासदार रणजितसिंह व आमदार रामराजे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विविध समाज माध्यमांवर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. एकूणच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना यावेळी राजकीय निर्णय घेणे एवढे सोपे नक्कीच राहिलेले नाही.
तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांमध्ये धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढ्यात अनौपचारिकरित्या प्रचाराला सुरुवात केली आहे. मंगळवारी त्यांनी करमाळा तालुक्यात श्रीदेवीचा माळ, पोथरे, कामोणे, बिटरगावश्री, आळजापूर, खडकी, जातेगाव, पुनवर, वडगाव आणि मांगी या गावांना भेट दिली होती. आपण जनमताचा कौल जाणून घेण्यासाठी लोकांच्या गाठीभेटी घेत असल्याचे पत्रकारांशी बोलताना धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले.
रणजितसिंह नाईक निंबाळकरांना यांना रामराजे नाईक निंबाळकर व विजयसिंह मोहिते -पाटील यांच्या नाराजीचा मोठा फटका बसू शकतो हे मात्र निश्चित...