फलटण प्रतिनिधी -
सुखी समाधानी, स्वच्छ, सुंदर, विकसीत फलटण शहर आणि येथे एकमेकांविषयी असलेला प्रेम, आपुलकी, जिव्हाळा गेल्या ३० वर्षात अचानक संपुष्टात आला असून शेती, व्यापार या माध्यमातून सुखी समाधानी असलेला इथला सर्वसामान्य माणूस दुःखी, कष्टी, चिंताक्रांत झाला आहे. त्याला पुन्हा सुखी समाधानी करण्याचा आपला प्रयत्न आहे त्यासाठी महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांना विजयी करा असे आवाहन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
फलटण - कोरेगाचे महायुतीचे उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांच्या प्रचारार्थ शहरातील विविध भागात नागरिकांच्या गाठीभेटी व कोपरा सभेत रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी तालुका संघर्ष समितीचे
अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम, भाजप अध्यात्म आघाडीचे तालुकाध्यक्ष अशोकराव जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्त्री पुरुष नागरिक उपस्थित होते. लोकसभेत गेल्यानंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून सगळे बदलण्याची किंबहुना फलटणला पूर्ववैभव प्राप्त करुन देण्याचा आपला प्रयत्न होता, पण करोनामध्ये अडीच वर्षे गेली आणि उर्वरित अडीच वर्षात बरेच काम केले. मात्र, लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाला, आपला घात झाला, पण तरीही खचून न जाता फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी खंबीरपणे उभा राहिलो आहे असे मा. खा. रणजितसिंह ना. निंबाळकर म्हणाले.
पूर्वी फलटण एक टुमदार शहर होते, उत्तम बाजार पेठ, स्वच्छ रुंद रस्ते, उत्तम प्रा. शाळा इमारती व दर्जेदार प्रा. शिक्षण, भाजी मंडई, सांडपाण्याची उत्तम व्यवस्था सारे समाधान देणारे होते पण या सगळ्या व्यवस्थेला दृष्ट लागली, सगळेच बिघडले मात्र इथल्या सोशिक नागरिकांनी कधी त्याबाबत तक्रार केली नाही. परिणामी सगळेच नामशेष झाले आणि स्वच्छ, सुंदर, समाधानी फलटण शहरात घाणीचे साम्राज्य, रस्त्यांची दुरावस्था, स्वच्छता गृहांची वाणवा, प्रा. शाळा मोकळ्या आणि खाजगी शाळा गर्दीने फुलल्या, भाजी मंडई ओसाड आणि भाजी विक्रेते रस्त्यावर, बाजार पेठेत ग्राहक नसल्याने व्यापारी हवालदिल असे भयानक चित्र फलटण शहरात दिसत आहे.