फलटण : श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित येथील नामदेवराव सुर्यवंशी बेडके महाविद्यालयास नॅकचे (NAAC) B मानांकन प्राप्त झाले असून त्याच दरम्यान श्रीराम एज्युकेशन सोसायटीस महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित केल्याची माहिती संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
संस्थेला मिळालेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार आणि नॅक B मानांकनाबाबत माहिती देण्यासाठी संस्थेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, महाविद्यालयाचे नॅक समन्वयक प्रा. राजेंद्र कुलकर्णी उपस्थित होते.
नामदेवराव सुर्यवंशी बेडके महाविद्यालयास नॅक मानांकन प्राप्त झाल्यामुळे संस्थेला या महाविद्यालयात नवीन अभ्यासक्रम सुरु करुन विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर व कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या नवनवीन संधी उपलब्ध करुन देता येणार असल्याने संस्था त्यासाठी निश्चित प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके यांनी केले आहे.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणने नेहमीच ग्रामीण शेतकरी/शेतमजुरांसह कष्टकऱ्यांच्या मुले/मुलींसाठी माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण प्राधान्याने उपलब्ध करुन देण्याचा यशस्वी प्रयत्न केला असून त्यासाठी फलटण शहरात महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय, बालवाडी, मुलींसाठी स्वतंत्र माध्यमिक विद्यालय सुरु करताना ग्रामीण भागात सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल तरडगाव, म. फुले हायस्कूल सासवड, जानाई हायस्कूल राजाळे, छ. शिवाजी हायस्कूल वाखरी ही विद्यालये ग्रामीण भागात सुरु करुन ग्रामीण विद्यार्थी विशेषत: मुलींना शिक्षणाची नामी संधी उपलब्ध करुन दिली असल्याचे डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित शहर व तालुक्यातील या प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालयामध्ये सुमारे ५५०० ते ६ हजार विद्यार्थी/विद्यार्थिनी शिक्षण घेत असून सुमारे २०० ते २२५ शिक्षक/शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असल्याचे डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके यांनी निदर्शनास आणून दिले.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण या संस्थेची स्थापना सन १९५९ मध्ये झाली असून सन २००४ मध्ये संस्थेच्या नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय, फलटणला महाराष्ट्र शासनाने कायम विना अनुदानित तत्त्वावर परवानगी दिली आहे, दि. १८ ऑगस्ट २००४ रोजी स्थापना होऊनही कायम विना अनुदानित तत्त्वावर कार्यरत असल्याने अद्याप नॅक मानांकन प्राप्त झाले नाही, तथापि यावर्षी त्यासाठी प्रयत्न केल्यानंतर नॅक मानांकन प्रक्रिया जून २०२३ पासून सुरु करण्यात आली, नॅकचे नियम, निकषानुसार मागील ५ वर्षातील आवश्यक माहिती कागदपत्रांसह ऑन लाईन पाठविण्यात आल्याचे डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके यांनी सांगितले.
त्यानंतर भक्त कवि नरसिंह मेहता विद्यापीठ जुनागढ गुजरातचे कुलगुरु डॉ. चेतनकुमार त्रिवेदी, पं. रविशंकर शुक्ल विद्यापीठ रायपूर छत्तीसगड येथील प्रा. डॉ. उमा गोळे, माता गुजरी कॉलेज, फत्तेगडसाहेब पंजाबचे प्राचार्य डॉ. कश्मीर सिंग या नॅक समिती सदस्यांनी महाविद्यालयास भेट देवून माहिती घेतल्यानंतर आपला अहवाल राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषद बंगलोर यांना पाठविला त्याआधारे नामदेवराव सुर्यवंशी बेडके महाविद्यालयास आगामी ५ वर्षांसाठी B मानांकन प्राप्त झाल्याचे परिषदेने कळविले असल्याचे डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके यांनी निदर्शनास आणून देत या कामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय जाधव, समन्वयक प्रा. राजेंद्र कुलकर्णी, विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करुन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सविता सुभाषराव सुर्यवंशी बेडके, मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सुर्यवंशी बेडके, नियामक मंडळ सदस्य महेंद्र सुभाषराव सुर्यवंशी बेडके, सौ. ज्योती सचिन सुर्यवंशी बेडके यांच्यासह नियामक मंडळ अन्य सदस्यांनी अभिनंदन करताना महाविद्यालयाच्या कामकाजा बाबत समाधान व्यक्त केले आहे.
संस्थेने समाजकल्याण क्षेत्रात मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय व अंधश्रद्धा निर्मुलन, जनजागरण वगैरे क्षेत्रात गेल्या १० वर्षांहुन अधिककाळ कार्यरत राहुन केलेल्या कामाची दखल घेऊन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते संस्थेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देवून गौरविल्याचे निदर्शनास आणून देत याकामी प्रस्ताव तयार करण्याची सूचना ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी केल्याचे डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके यांनी आवर्जून सांगितले.