फलटण : वार्षिक स्नेहसंमेलन हा विद्यार्थ्यांसाठी आनंद सोहळा असतो. त्याद्वारे त्यांच्या आवडीनुसार कला सादर करण्याची संधी मिळते.अर्थातच त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचा विकास होण्यास असे कार्यक्रम उपयुक्त ठरतात, असे विचार तहसिलदार डॉ.अभिजित जाधव यांनी व्यक्त केले.
महात्मा एज्युकेशन सोसायटीचे श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळा, चतुराबई शिंदे बालक मंदिर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाचा शुभारंभ तहसीलदार डॉ.अभिजित जाधव, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आला. त्याप्रसंगी डॉ.अभिजित जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुभाषराव शिंदे होते. यावेळी संस्थेचे सचिव रविंद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष शांताराम आवटे, ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव, श्रीराम विद्याभवन शाळा समितीचे अध्यक्ष रविंद्र बर्गे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय शाळा समितीच्या अध्यक्षा सौ.अलका बेडकिहाळ, पालक प्रतिनिधी सारीका वाघ, उदय पुजारी, धनश्री जाधव, मुख्याध्यापक (प्राथ.) मनीष निंबाळकर, मुख्याध्यापक (माध्य.) भिवा जगताप, मुख्याध्यापक (बालवाडी) सुरेखा सोनवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.प्रसाद जोशी म्हणाले, अलीकडची नवीन पिढी प्रचंड उर्जा घेऊन आलेली आहे. ती उर्जा विकसित करण्यासाठी अशी शालेय स्नेहसंमेलने उपयुक्त ठरतात.
संस्थेला अगदी सुरुवातीपासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. परंतु सर्व पदाधिकार्यांच्या सहकार्याने व पालकांच्या विश्वासावर संस्थेच्या सर्व शाखा फलटण शहरात उत्तम काम करत आहेत. सर्व शाखा विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवून उद्याचे सुजाण नागरीक घडवण्याचे उत्तम काम करत आहेत. यामुळे सर्व शाखा फलटण शहरात नावारूपाला आल्या आहेत, असे आपल्या प्रास्ताविकात रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले.
दरम्यान स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी नानाविध कार्यक्रमातून राज्याच्या सांस्कृतिक वारस्याचे दर्शन घडवले. प्रत्येक कलाकृतीचे उपस्थित प्रेक्षक व पालक यांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रारंभी वर्षभरात शालेय उपक्रमात उल्लेखनीय कार्य करणार्या विद्यार्थ्यांना संस्थेकडून नेताजी सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. त्यात प्राथमिक विभागात सत्यजित सचिन मोरे, गायत्री सचिन पाटील आणि तन्वी विश्वनाथ मदने, माध्यमिक विभागात रोहन विठ्ठल भगत आणि सिद्धी प्रितम काटे यांना हे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच आंतरशालेय घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. उपस्थितांचे स्वागत भिवा जगताप यांनी केले. मनीष निंबाळकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन हेमलता गुंजवटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.