महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा वाढदिवस शहर व तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. दरम्यान येथील अनंत मंगल कार्यालयात श्रीमंत रामराजे यांनी शहर व तालुक्यातील आम जनतेच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.
फलटण : महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा वाढदिवस शहर व तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. दरम्यान येथील अनंत मंगल कार्यालयात श्रीमंत रामराजे यांनी शहर व तालुक्यातील आम जनतेच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. विविध क्षेत्रातील मान्यवरांपासून ते स्थानिक पातळीवरील सर्वसामान्य माणसांपर्यंतच्या घटकांनी श्रीमंत रामराजे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
श्रीमंत रामराजे यांनी तालुक्यातील जनतेला पुष्पहार व बुके आणू नयेत अशा केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत शुभेच्छा प्रसंगी विविध वृक्षांची रोपे भेट म्हणून देण्यात आली. हजारो वृक्षांची भेट म्हणून आलेली रोपे शहर व तालुक्यात लावली जाणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संबंधीत रोपांची लागण आणि संवर्धानाची जबाबदारी घेणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
शिस्तबध्द कार्यक्रमाचे नियोजन
श्रीमंत रामराजेंना शुभेच्छा देण्यासाठी सकाळीपासूनच अनंत मंगल कार्यालयासमोर शुभेच्छुकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. आयोजक व संयोजकाचे शिस्तबध्द कार्यक्रमाचे चित्र पहायला मिळाल्याने शहरवासियांमध्ये समाधान व्यक्त केले जात होते. रेकॉर्डब्रेक गर्दी, शॉल, हार, बुके यांचा लागलेला ढिग हजारो वृक्ष रोपांची हिरवळ, विविध साप्ताहिक आणि वृतपत्रांचे गठ्ठे असे चित्र यावेळच्या वाढदिवसाचे पहायला मिळत होते.
शिस्तबद्ध नियोजनामुळे उपस्थित सर्वांनाच श्रीमंत रामराजे यांना प्रत्यक्ष भेटुन शुभेच्छा देण्याची संधी मिळाली. रात्री उशिरापर्यंत विविध भागातून लोक श्रीमंत रामराजे यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. दरम्यान महाराष्ट्राच्या किंबहुना देशातील विविध मान्यवरांकडून त्यांना फोनवरून शुभेच्छा येत होत्या. सातारा जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषि, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक, संगीत, नाटय अशा विविध क्षेत्रातील घटकांनी श्रीमंत रामराजे यांना वाढदिवसाच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
तरूणांची विचारपूस
शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या असंख्य तरुणांनी श्रीमंत रामराजे यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वाधिक गर्दी केली होती. शुभेच्छा स्थळी येणाऱ्या प्रत्येक युवकासोबत ते संवाद साधत होते. त्यांची विचारपूस करत असल्याचे चित्र यावेळी प्रकर्षाने जाणवत होते. त्यामुळे तरुण वर्गाच्या चेहऱ्यावरील आनंद व आत्मिक समाधान लपुन राहत नसल्याचे दिसत होते.