फलटण : फलटण तालुक्यात किंबहुना सातारा जिल्ह्यात पशूधन संख्या प्रचंड असल्याने लंपी स्किन डीसीज सुरु होताच पशू पालक शेतकरी धास्तावला तथापि पशू संवर्धन विभाग तत्पर असून त्यांनी योग्य नियोजन करुन तालुक्यात सुमारे ८० टक्के लसीकरण पूर्ण करण्याबरोबर बाधीत जनावरांवर आवश्यक उपाय योजना सुरु केल्याने कोणीही घाबरुन न जाता योग्य औषधोपचार व लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
फलटण तालुक्यात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने दुभत्या जनावरांसह बैल, कालवड, खोंड वगैरे जनावरांची संख्या मोठी असल्याने लंपी आजाराबाबत वस्तुस्थिती समजावून घेऊन पशू पालक शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याच्या उद्देशाने आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीस आ. दीपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार, पशू संवर्धन उपायुक्त डॉ. परिहार व पशू संवर्धन विभागाचे संबंधीत अधिकारी आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य उपस्थित होते.
लंपी स्किन डीसीज हा आजार डांस, गोचीड वगैरे द्वारे पसरत असून या संसर्गजन्य आजार बाधीत जनावरांसाठी योग्य औषधोपचार आणि लसीकरण करतानाच आपला गोठा व परिसर स्वच्छ ठेवल्यास हा संसर्गजन्य आजार पसरविणाऱ्या डांस, गोचीड, चीलटांचा प्रतिबंध झाल्याने अन्य जनावरांना हा आजार होणार नाही याची नोंद घेऊन योग्य उपाय योजना करण्याचे आवाहन यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
गरज वाटल्यास खाजगी पशू वैद्यक यांची मदत घेण्याबरोबर जादा कर्मचारी उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आणि गरज असेल तर वाहने उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.
सुमारे ५ हजार जनावरांसाठी एक पशू वैद्यक दवाखाना असे निकष विचारात घेता फलटण तालुक्यात पुरेसे दवाखाने आणि आवश्यक अधिकारी/कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही तथापि उपलब्ध अधिकारी/कर्मचारी यांच्या मदतीला शासनाच्या मान्यतेने खाजगी पशू वैद्यक आणि पशू वैद्यकिय महाविद्यालय, शिरवळ येथील विद्यार्थ्यांची मदत घेऊन तालुक्यात ८० टक्के पर्यंत लसीकरण पूर्ण केल्याचे निदर्शनास आणून देत उर्वरित लसीकरण पूर्ण करण्यात येत आहे. पुरेशी लस मात्रा उपलब्ध असल्याचे तसेच गेल्या २ दिवसात काही अधिकारी/कर्मचारी ही शासनाने उपलब्ध करुन दिल्याचे पशू संवर्धन उपायुक्त डॉ. परीहार यांनी निदर्शनास आणून दिले.
फलटण तालुक्यात गाय वर्ग पशू धन ९८ हजार ३६४ असून त्यापैकी ५१४ जनावरे बाधीत असून ३३ जनावरे दगावली आहेत, त्यामध्ये १५ गाई, ५ बैल, १३ वासरे असून ४२ जनावरे उपचारानंतर बरी झाल्याचे आणि ७९ हजार ७६० जनावरांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे पंचायत समिती कडील पशू संवर्धन विस्तार अधिकारी डॉ. फाळके यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
दगावलेल्या जनावरांना शासन आर्थिक मदत देणार असून दुधाळ गाई ३० हजार, बैल २५ हजार आणि वासरु १६ हजार रुपये दिले जाणार आहेत, मात्र ही सवलत प्रत्येकी ३ जनावरांपर्यंत असल्याचे यावेळी डॉ. परीहार यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार यांनी समारोप व आभार मानले.