फलटण प्रतिनिधी -
विरोधकांनी त्यांच्या गटातील उपसरपंच व इतर सदस्यांना चुकीचं वागा असा आदेश दिल्याने उपसरपंच व सदस्यांनी विकासाला अडथळा निर्माण केला. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली आहे. त्यामध्ये कोणताही राजकीय दबाव नाही, हे सदस्य आमचेच नातेवाईक आहेत. मात्र, या भकासरत्न माणसाने त्यांना चुकीचं वागण्यास प्रवृत्त केले. गावच्या विकासाला आड येणाऱ्याला यापुढे सोडणार नाही, असा इशारा लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर नाव न घेता दिला.
आयुक्तांनी केलेल्या विडणी गावच्या उपसरपंच व इतर आठ सदस्यांवर झालेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत लोकनियुक्त सरपंच सागर अभंग बोलत होते. या वेळी विडणी विकास आघाडीचे मार्गदर्शक व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सागर अभंग म्हणाले, विडणी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच ॲड.सुनील अब्दागिरे व इतर आठ सदस्य यांनी विकासाला अडथळा निर्माण केला व तत्कालीन ग्रामसेवक एकळ यांच्या सहीचा नमुना बदलू दिला नाही, तसेच त्यांचे नेते मासिक मीटिंगमध्ये अडथळे निर्माण करण्याचे आदेश देत असल्याने या सर्वांवर नियमानुसार कारवाई झाली आहे. आमचे विरोधक नेत्यांच्या चुकीच्या सांगण्यावरून उपसरपंच व सदस्य हे मासिक मीटिंगमध्ये नेहमीच विरोध करीत असत.
या विरोधामुळे गावाचा विकास थांबला होता. यामुळेच गटविकास अधिकारी व इतर अधिकाऱ्यांकडे आम्ही लेखी तक्रार दाखल केली होती. आमचे नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व मंत्री जयकुमार गोरे हे नेहमीच तत्त्वाचे राजकारण करतात ते कधीही चुकीचं घडू देत नाहीत उलट सर्वांना बरोबर घेऊन राजकारण करा, असे आम्हाला सांगतात. त्यामुळे आम्ही कधीही विकासात राजकारण आणत नाही; परंतु हे विरोधक २४ तास केवळ राजकारण करतात. त्यांच्या चुकीच्या राजकारणामुळे उपसरपंच व आठ सदस्यांना कारवाईला सामोरे जावे लागले, असे सागर अभंग यांनी सांगितले.