फलटण प्रतिनिधी : गेली 10 वर्ष भाजपा सरकार बरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) आहे. मात्र आरपीआयच्या कार्यकर्त्याला सत्तेत कोणताही वाटा मिळत नाही. अनेक वेळा कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही. भाजपाला केवळ आमची मते हवी असतात हे सर्वं प्रकार आता थांबले पाहिजेत अन्यथा येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत वेगळा विचार केला जाईल असा ठराव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) च्या फलटण येथील झालेल्या प्रमुख कार्यकर्ता बैठकीत करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत महाराष्ट्र कार्यकरणी सदस्य सुनील भालेराव यांनी दिली. फलटण येथील विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे बोलताना भालेराव म्हणाले की, भारतीय जनता पार्टी कडून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना समानतेची वागणूक मिळत नाही. तर महायुतीतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा घटक पक्ष असताना देखील राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा फोटो व पक्षाचा निळा झेंडा महायुतीच्या कार्यक्रमात लावला जात नाही अशी खंत व्यक्त केली. माढा मतदार संघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची ताकत मोठी असून केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांना मानणार मोठा मतदार आहे. यापुढे महायुती कडून सन्मानाची वागणूक न मिळाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत माढा मतदार संघात वेगळा विचार करावा लागेल याचा पुनरुच्चार भालेराव यांनी या वेळी केला.
येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांना शिर्डी मधून उमेदवारी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली तर सोलापूर लोकसभा मतदार संघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला द्यावा असे यावेळी सुनील भालेराव म्हणाले.
या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जेष्ठ नेते मधुकर काकडे, विजय येवले, एन.के.साळवे, मुन्ना शेख, संजय निकाळजे, राजू मारुडा, सतीश वाघमारे, धनाजी पवार,सुनील भोसले, राजेंद्र जगताप, कुणाल गडांकुश, दयानंद धाइंजे, दिपक अहिवळे, सतीश अहिवळे, लक्ष्मण अहिवळे, सौ.राखी कांबळे, विमलताई काकडे, सौ. वंदना यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते.