फलटण प्रतिनिधी -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ उद्या दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी फलटण येथील गजानन चौक याठिकाणी सायंकाळी ६ वाजता खा. शरद पवार यांची सभा होणार आहे. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे मा. सभापती विश्वजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, यांच्यासह फलटण तालुक्यातील विविध पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच साखरवाडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली होती यावेळी त्यांनी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली होती. यावर खा. शरद पवार काय बोलणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
फलटण तालुक्यातील राजे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच खा. शरद पवार यांच्याबरोबर होता. पक्ष फुटी नंतर रामराजेंसह राजे गट अजित पवार यांच्याबरोबर महायुतीमध्ये सामील झाला होता. मात्र लोकसभेच्या निवडणुकीवेळी मात्र स्थानिक राजकारणाला कंटाळून महायुतीला थेट विरोध करत महाविकास आघाडीचे राजे गटाने काम करत धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडणूक आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. मात्र विधानसभा निवडणूकीला पुन्हा एखदा राजे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि राजकीय गणिते बदलली. मात्र आ. रामराजे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत ते मात्र अद्याप तांत्रिकदृष्टीने त्याच पक्षात आहेत.