फलटण :
पक्षाकडे कोणी उमेदवारी मागितली? या खा. शरद पवार यांच्या प्रश्नावर काहींनी आपण उमेदवारीची मागणी केलेचे सांगितले. त्यावेळी तुमचे काय असा थेट प्रश्न खा. पवार यांनी फलटण येथील पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते नंदू मोरे यांना विचारला. त्यावर मोरे यांनी आपला निर्णय अंतिम असेल असे उत्तर दिले. हा संवाद आहे खा. शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंद बाग या निवास्थानीचा. फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजातील उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी याकरिता संविधान समर्थन समिती फलटणचे सदस्य खा. पवार यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी वरील संवाद झाला.
फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजाला प्रतिनिधी करण्याची संधी मिळावी याकरता गेले काही दिवसांपासून संविधान समर्थन समितीच्या वतीने अभियान सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सुप्रीमो खा. शरद पवार यांची भेट घेण्यात आली.
खा. शरद पवार यांनी अनेक वेळेला सूचक विधाने करीत राज्याला आणि देशाला अचंबित केले आहे. अनेक वेळा त्यांच्या प्रश्नामध्ये त्याचे उत्तर दडलेले असते. त्यामुळे नंदू मोरे यांना तुमचे काय? या प्रश्नातच नेमकेपणाने उत्तर दडले आहे की काय ? असे राजकीय जाणकार सांगतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच गेली 25 वर्ष फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते नंदू मोरे हे खा. शरद पवार यांचे कट्टर समर्धक म्हणून सुपरिचित आहेत. स्वार्थी राजकीय सत्ता संघर्षात पक्षाने काय दिले यापेक्षा आपण पक्षासाठी काय केले पाहिजे हे नंदू मोरे यांचे सूत्र. काही निवडणूकीमध्ये मोरे यांनी आपले नशीब आजमवून पाहिले आहे. मात्र खा. पवार साहेब व त्यांच्यामध्ये कधीच अंतर पडले नाही हे विशेष. त्यामुळे खा. पवार यांनी नंदू मोरे यांना तुमचे काय? या प्रश्नामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
या पूर्वी पक्षाशी कोणताही संबंध नसणाऱ्या व्यक्ती पेक्षा नंदू मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळाली तरी फार आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. निष्ठावंत कार्यकर्त्यांना शरद पवार न्याय देतात हे महाराष्ट्राने पाहिले आहे.