फलटण प्रतिनीधी:- माढा लोकसभा निवडणुकीची महाराष्ट्रात चर्चा रंगली असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार महादेवराव जानकर यांनी आज सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची फलटण येथील “सरोज – व्हिला” या निवासस्थानी भेट घेतली.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महादेवराव जानकर हे माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याने या भेटीला वेगळॆ महत्व प्राप्त होत आहे.
महाविकास आघाडी कडून त्यांच्या नावाची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती. तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी श्रीमंत संजीवराजे हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याने या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात असल्याने चर्चांना उधान आले आहे.
आगामी लोकसभा निवडणूकी संबंधी बोलताना महादेवराव जानकर म्हणाले की, माझा व रामराजे यांचा पक्ष वेगवेगळा असल्याने यासंबंधी मी कोणतेही भाष्य करणार नाही. मात्र रामराजे हे माझ्या मोठे बंधू समान असून मी योग्यवेळी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी नक्की परत येईन असे यावेळी जानकर म्हणाले.
श्रीमंत रामराजे यांनी विधानपरिषदेचे सभापती असताना मला मायेच प्रेम दिले असल्याचे यावेळी माध्यमांशी बोलताना महादेव जानकर म्हणाले असून आजची भेट ही वैयक्तिक असल्याचे यावेळी जानकर यांनी सांगतानाच कैलासवासी श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर हे मंत्री असतान माझ्या कुटुंबीयांनी त्यांना मतदान केले आहे त्यामुळे जेवढा हक्क मालोजीराजेंवर रामराजे व त्यांच्या कुटुंबाचा आहे तेवढाच हक्क माझाही असल्याचे या वेळी बोलताना महादेवराव जानकर म्हणाले.
सातारा जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कामासंबंधी संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव झाल्याची आठवण यावेळी माजी मंत्री जानकर यांनी सांगितली. तर सातारा जिल्हा हा गौरवशाली क्रांतीकारकांचा असल्याचे सांगतानाच इथली माती ही होळकर, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची असल्याचे अभिमानाने सांगितले.