फलटण : महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वात फलटण येथे पार पडलेला भव्य कार्यकर्ता मेळावा खासदार गटाच्या जिव्हारी लागला आहे. मेळाव्यात आ.श्रीमंत रामराजेंनी विद्यमान खासदारांना तिकीट मिळून देणार नसल्याचा दिलेला इशारा ओळखून आता आपलेही राजकीय दुकान लवकरच बंद होणार या भितीने मलठणच्या माजी नगरसेवकाने राजे गटाच्या मेळाव्यावर टिका केली आहे. या दीड दमडीच्या माजी नगरसेवकाची श्रीमंत रामराजेंवर टीका म्हणजे विझणार्या दिव्याची फडफड आहे, असा टोला राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये लगावला आहे.
फलटण येथे पार पडलेल्या राजे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यावर खासदार गटाचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये टिका केली होती. त्या टिकेला अशोकराव जाधव यांचा नामोल्लेख टाळून प्रितसिंह खानविलकर यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दि.1 रोजी फलटणला आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात राजे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. सदर मेळाव्यास फलटण, माण, खटाव, उत्तर कोरेगाव येथून उत्स्फुर्तपणे आ.श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते उपस्थित होते. येणार्या काळात श्रीमंत संजीवराजे यांना खासदार करण्याचा निर्धार राजे गटाने केला आहे. विरोधकांनी या निर्धाराची धास्ती घेतल्यानेच त्यांच्यातले वाचाळवीर माजी नगरसेवक मेळाव्यावर तोंडसुख घेत आहेत. आ.श्रीमंत रामराजे यांच्याविरोधात बोलताना त्यांनी स्वत:च्या लायकीचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. इथून पुढे त्यांनी आ.श्रीमंत रामराजेंवर तोंडसुख घेतले तर त्यांना जशास तसे उत्तर मिळेल, असा इशाराही प्रितसिंह खानविलकर यांनी दिला आहे.