फलटण : सचिन मोरे
लोकसभा निवडणूकीचा बिगुल वाजला असून प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. माढा लोकसभा मतदार संघात महायुती कडून भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहिर झाली असली तरीही माढ्याचा तिढा अजून कायमच असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची सागर निवास्थानी घेतलेली भेट व तदनंतर व्हाट्सअप स्टेटस च्या माध्यमातून आपली भूमिका कार्यकर्त्यांची विचार - विनिमय करुन ठरवणार असल्याचे सांगून पुन्हा एकदा नवा संभ्रम निर्माण केला असला तरीही रामराजे युतीधर्मच पाळतील असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज असून आज फलटण येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत माढ्याचा तिढा सुटणार असल्याचे बोलले जात आहे.
गेली 32 वर्षाहून अधिक काळ फलटण तालुक्यात रामराजे यांची एकहाती सत्ता आहे. तर सातारा जिल्ह्यातील राजकारणामध्ये रामराजे यांना विशेष महत्व आहे. मात्र त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी व भाजपाचे माढा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करण्याची वेळ युती धर्मामुळे रामराजे यांच्यावर आली असली तरीही राजकारणातील मुरब्बी असलेले रामराजे आपल्या "रामराजे नितीतून " ही वेळ निभावून राजकीय गणिते जुळवतील असे जाणकार सांगतात.
भाजप उमेदवार रणजितसिंह यांना लोकसभा निवडणूकीत मदत केल्यास भविष्यातील फलटण तालुक्यातील राजकारणासाठी खासदार रणजितसिंह डोईजड होणार का? हा प्रश्नही रामराजेंना सतावत असणार आहे. आमदार दिपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांच्या समवेत फलटण येथे काल झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला रामराजे गटाच्या कार्यकर्त्यांनाचा विरोध असल्याचे स्पष्ट दिसत होते. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना यावेळी राजकीय निर्णय घेणे नक्कीच एवढे सोपे नसले तरीही
कार्यकर्त्यांना विश्वासात घेत महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचाच प्रचार रामराजे आपल्या गटासह करतील व महायुती धर्म पाळतील असे अनेक राजकीय जाणकारांनी धैर्य टाईम्सशी बोलताना आपले मत व्यक्त केले.
"हातात तुतारी घ्या" कार्यकर्त्यांचा आग्रह : राजे गटातील कार्यकर्त्यांची विनवणी
माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांना अलविदा करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ देत महायुतीमध्ये रामराजे काही महिन्यापूर्वी सामील झाले. वास्तविक पाहता अजित पवार व रामराजे हे गणित कधीच न जुळणारे परंतु कसे जमले हे मात्र कोडेच ! फलटण तालुक्यातून रामराजे यांनी पुन्हा एकदा खासदार शरद पवार यांची गळाभेट घेत तुतारी हातात घ्यावी व श्रीमंत संजीवराजे यांना माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
असो.. आता मात्र पुन्हा एकदा मोठा यक्ष प्रश्न रामराजे यांच्या समोर उभा ठाकला असला तरीही चाणाक्ष रामराजे योग्य मार्ग निवडणार हे सांगायला नकोच...