फलटण प्रतिनिधी:
पावसाने पाठ फिरवल्याने फलटण तालुक्यात दुष्काळाच्या समस्या दिवसेंदिवस भीषण होत आहेत. पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई याचा मोठा प्रश्न आहे. दुष्काळाची दाहकता जाणवत असताना, पंचायत समितीतील अधिकारी मात्र केवळ खुर्चीभोवतीच घुटमळत असल्याचे चित्र आहे. याप्रकरणी पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी लक्ष देणार का असा सवाल ग्रामीण भागातील जनता विचारत आहे.
दरवर्षी पेक्षा यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने फलटण तालुक्यात दुष्काळाची मोठी भीषण परिस्थिती आ वासून उभी आहे. तालुक्यातील अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची फरफट सुरु आहे. टँकरच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. टँकरने पाणी पुरवठा सुरु असला तरी पाणी टंचाई जाणवत आहे. जनावरांनादेखील पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. येणाऱ्या काळात जनावरांना चाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नसताना फलटण पंचायत समितीच्या कारभाऱ्यांना मात्र दुष्काळाचा विसर पडला आहे.
पंचायत समितीचा संपुर्ण कारभार सध्या गट विकास अधिकारी यांच्याकडे आहे मात्र गट विकास अधिकारी हे खुर्चीभोवतीच घुटमळत आहेत. दुष्काळाच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा करण्यापेक्षा पंचायत समितीतील कामांतच त्यांना जास्त इंटरेस्ट असल्याची चर्चा आहे. गट विकास अधिकारी गावांची पाहणी करताना स्थानिक आढावा घेताना दिसत नाहीत. एकंदरीतच पंचायत समिती प्रशासनाकडे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा होताना दिसून येत नाही.
नुकतेच काही दिवसांपूर्वीच बदलीने हजर झालेले गट विकास अधिकारी हे कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त असून तालुक्यात ग्रामस्तरीय स्थरावर पाणीटंचाई व चाराटंचाई बाबत कोणत्याच प्रकरच्या बैठका, नियोजन,आढावा घेताना दिसून येत नाही. एकूणच पंचायत समितीचा कारभार पाहता फलटण तालुक्यात पंचायत समिती अस्तित्वात आहे की नाही असा भास ग्रामीण भागातील जनतेला होत आहे. या प्रकरणी आता पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी तसेच जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे