फलटण प्रतिनिधी :
शेतीच्या मालकी हक्कात अडथळा ठरणाऱ्या मयत खातेदार यांच्या नावांची ७/१२ उताऱ्यावरुन नोंद कमी करण्यासाठी मोठा निर्णय महाराष्ट्र शासन महसूल विभागाने घेतला असून दि. १ एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात 'जिवंत सातबारा मोहीम' राबवली जात असल्याचे निदर्शनास आणून देत फलटण तालुक्यात ही मोहिम प्रभावीपणे राबविणार असल्याचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी सांगितले.
महसुल विभाग 100 दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत, सातबारावरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अद्ययावत केल्या जाणार असून फलटणचे तहसिलदार तथा सदर मोहिमेचे समन्वय अधिकारी डॉ. अभिजीत जाधव यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात या मोहीमेला सुरुवात झाली आहे.
या मोहिमेचा मुख्य उद्देश मयत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनी संबंधित कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद वेळेत व्हावी हा आहे. अनेकदा वारसांची नोंद नसल्यामुळे अडचणी येतात, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यातील ज्या नागरिकांच्या सातबारावर अशा नोंदी राहिल्या असतील त्यांनी संबंधित तलाठ्यांकडे जाऊन आपल्या नोंदी करून घ्याव्यात, असे आवाहन महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सदर मोहिमेचा खालीलप्रमाणे कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे
1 एप्रिल, 2025 ते 5 एप्रिल, 2025: तलाठी गावांमध्ये चावडी वाचन करून मयत खातेदारांची यादी तयार करतील.
6 एप्रिल, 2025 ते 20 एप्रिल, 2025: वारसांनी आवश्यक कागदपत्रे तलाठ्यांकडे जमा करायची आहेत. तलाठी पडताळणी करून वारस ठराव मंजूर करतील.
21 एप्रिल, 2025 ते 10 मे, 2025: तलाठी वारस फेरफार तयार करतील आणि मंडळ अधिकारी 7/12 दुरुस्त करतील.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मयत खातेदारांच्या याद्या तलाठी यांचेमार्फत तयार करण्यात येत आहेत. संबंधित मयत खातेदार यांचे वारसांनी मृत्यू प्रमाणपत्र व वारसांची माहिती संबंधित तलाठी यांचेकडे द्यायची आहे.