फलटण प्रतिनीधी -
एकीकडे मोठा गाजावाजा करून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत फलटण शहरात घंटागाड्या फिरत आहे. दुसरीकडे अनेक भागात घंटागाड्या येत नसल्याने काही नागरिक कचरा रस्त्यावर आणून टाकत आहेत तर काही नागरिक रस्त्यावरच हा कचरा जाळून टाकत आहेत. एकंदरीतच फलटण नगर परिषद ही नावालाच कचरा संकलन व व्यवस्थापन करत असल्याचे चित्र आहे.
फलटण शहरात अनेक भागात उघड्यावर पडलेला कचरा पहाता घंटागाड्या आहे की नाही हा प्रश्न समोर येत असून फलटण शहरात कोट्यावधी रुपये खर्च घंटागाड्या सुरू झाल्या आणि प्रत्येक प्रभागात जाऊन त्या घंटागाड्या कचरा जमा करत आहेत असे कागदावर सांगितले जात असले तरी अनेक भागात नागरिकांनी मागणी करूनही घंटागाड्या कचरा जमा करत नसल्याने जागोजागी कचरा तयार होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात घंटागाड्या गाड्या ठराविक ठिकाणी फिरून कचरा जमा करत आहेत त्यामुळे अनेक भागात जागोजागी असलेले कच-याचे ढीग दिसत आहेत. कचरा उघड्यावर टाकल्यामुळे सर्वत्र घाण आणि दुर्गंधी पसरत आहे तर काही वेळा कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे प्रदूषण होत असल्याने हा प्रकार बंद होणे आवश्यक ठरत आहे.
ओला व सुका कचरा विलगीकरणच बंद
अनेक ठिकाणी घंटागाडी अनियमित येणे, अनेक ठिकाणी घंटागाडी न येणे आदी तक्रारी आहेत. यात कळीचा मुद्दा म्हणजे, ओला व सुका कचरा विलगीकरणच बंद आहे. नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करून देत असताना घंटागाडीत कचरा संकलित करताना तो एकत्र केला जात आहे.घंटागाडीत कचरा संकलित करण्यासाठी एकही कर्मचारी नसल्याने नियमांनुसार कचरा संकलीकरण होत नाही. घंटागाडीच्या कामाची पद्धत पाहता घंटागाडी ठेकेदारा विरोधात महाराष्ट्र नगरपंचायती, नगरपरिषद आणि औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ नुसार कारवाई करण्याची मागणी होत आहे.
घंटागाड्याच्या तक्रारीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
फलटण शहरात जवळपास १६ घंटागाड्यातून कचरा गोळा केला जातो. अनेक भागात आजूनही घंटागाड्यातून कचरा गोळा होत नाही. नगर परिषदेकडे घंटागाडीच्या कचरा संकलना बाबत तक्रारी केल्यास घंटागाडीच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. अनेक भागात घंटा गाडी येत नसल्याने कचरा कोठे टाकावा हा प्रश्न अनेक नागरिकाच्या पुढे उभा राहत असल्याने इच्छा नसतानाही नागरिकांना उघड्यावर कचरा टाकण्याची वेळ येत आहे. नगर परिषद कर्मचारी कोणत्याही तक्रारीकडे लक्ष देत नसल्याने फलटण नगर परिषदेच्या कामकाजावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. स्वच्छता भारत योजनेतून कागदावरच विविध खर्च दाखवून शासनाची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे कचऱ्याचे ढीग
अनेक प्रभागात स्वच्छता काम करण्यासाठी व पाहण्यासाठी विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे परंतु सदरचे अधिकारी व कर्मचारी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याने अनेक भागात कचऱ्याचे ढीग आढळून येत आहेत. कचरा संकलन करणे, कचरा व्यवस्थापन करणे, झाडलोट करणे, तुंबलेली गटारे साफ करणे या बरोबर इतर स्वच्छता विषयक कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नगर परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कोणाचाही वचक व दबाव नसल्याने फलटण शहरात अनेक भागात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.