फलटण प्रतिनिधी : शहरातील असणारे ओपन स्पेस ( मोकळे प्लॉट) स्वच्छता करणे, शौचालय स्वच्छता करणे, तसेच माझी वसुंधरा अंतर्गत फलटण शहरातील विविध ठिकाणी केलेले वृक्षारोपणासाठी पाणी पुरवठा करणेसाठी आता फलटण नगरपालिकेने नवीन ट्रॅक्टर व टँकर घेऊन फलटणच्या सेवेसाठी सज्ज असल्याची माहिती फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
पुढे प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, फलटण शहरामध्ये गतवर्षी पावसाळ्याच्या दिवसामध्ये साथरोगाचा प्रादुर्भाव वाढले कारणाने शहरातील असणारे ओपन स्पेस ( मोकळे प्लॉट) स्वच्छता करणे कामी नगरपरिषदेने १२ प्रभागामध्ये लोकसहभागातून १२ जे.सी.बी मशीन व ट्रॅक्टर डोजर द्वारे स्वच्छता करणेत आलेली होती. या सर्व बाबींचा विचार करिता नगरपरिषदेने सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस व साथरोगाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता शहरातील असणारे ओपन स्पेस (मोकळे प्लॉट) तसेच रस्त्यालगत वाढलेले गवत इत्यादी काढणेचे काम करणे आवश्यक असलेने त्याकामी स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत नगरपरिषदेने एक ट्रॅक्टर परांडी घेणेत आलेली आहे, त्यामुळे शहरातील असणारे ओपन प्लॉट स्वच्छता करणेचे कामकाज लगेचच सुरुवात करणेत येणार आहे. तसेच फलटण शहरातील शौचालयाच्या अस्वच्छते बाबत वारंवार तक्रारी येऊ नयेत तसेच स्वच्छता कर्मचारी यांच्या कामाच्या वेळेत पाणी पुरवठा होत नसलेने शौचालय स्वच्छता करणे कामी अडचण निर्माण होत होती त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करिता शौचालय स्वच्छता व वेळेवर पाणी पुरवठा करणे कामी ट्रैक्टर टैंकर घेणेत आलेला आहे. सदरच्या ट्रॅक्टर टैंकर उपयोग शहरामधील असणारे सर्व शौचालयाची स्वच्छतेसाठी त्याचा वापर करणेत येणार आहे तसेच माझी वसुंधरा अंतर्गत विविध ठिकाणी केलेले वृक्षारोपणासाठी पाणी पुरवठा करणेसाठी होणार आहे. सदरकामी वापरण्यात येणारे पाणी हे रॉ वॉटर वापरणेत येणार आहे त्यामुळे शुध्द पाण्याची बचत होणार आहे तसेच शौचालय स्वच्छता व वृक्षारोपण संगोपन करणेसाठी स्वच्छता निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आलेली आहे.