सातारा दि. 20, – जिल्ह्यात आज अखेर 247.9 मि.मी. पावसाची नोंद झाली असून हा पाऊस एकूण 20 टक्के इतका आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणी साठा आहे. कोयना- 32.21% (37.56 TMC), धोम - 35.76 %, धोम बलकवडी - 72.22%, कण्हेर - 28.99%, उरमोडी - 40.21%, तारळी - 65.92%, सर्व धरणातील एकूण पाणीसाठा टक्केवारी – 35.36%.
धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात कोयनानगर -253 मि.मी., नवजा – 274 मि.मी., महाबळेश्वर – 334 मि.मी. पर्जन्याची नोंद झाली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर तसेच हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याच्या अनुषंगाने दरडप्रवण गावाकरिता संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली व सातारा तालुक्यातील 41 धोकादायक गावांमध्ये व इतर संवेदनशील धोकादायक गावांची समक्ष स्थळपाहणी करुन या गावांमध्ये असणाऱ्या धोकादायक कुटुंबांची तात्पुरत्या स्वरुपाच्या निवाऱ्याची व्यवस्था करणे आणि भोजन व शुध्द पेयजलासह निवाऱ्याची व्यवस्था करणे, संबंधित प्रशासकीय विभागाच्या मदतीने तात्काळ कार्यवाही करुन घेणे इत्यादी अनुषंगिक कामकाज पार पाडणेसाठी संपर्क अधिकारी म्हणून पुढील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
पाटण तालुक्यासाठी रामहरी भोसले, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक 04. गावांची नावे - आंबेघर तर्फे मरळी खालचे, आंबेघर तर्फे मरळी वरचे, ढोकावळे, हुंबरळी, मिरगाव, डावरी चोपडेवाडी, वरंडेवाडी, काहिर, दिक्षी, खुडुपलेवाडी, मेंढोशी बोर्गेवाडी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती), धनावडेवाडी/शिंदेवाडी (निगडे), जोशेवाडी (कालगाव), जायगुडेवाडी, कुसावडे (पलसरी) व इतर संवेदनशील धोकादायक गावे.
महाबळेश्वर तालुक्यासाठी मनोहर गव्हाड, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सातारा. गावांची नावे - येरंडल, धावली, दुधोशी, भेकवली वाडी, आचली, कुमठे (कामठवाडी), येर्णे बु, घावरी, मालुसरे, दरे, चिखली, चतूरबेट, नावली, येर्णे खुर्द, शिंदोळा व इतर संवेदनशील धोकादायक गावे.
वाई तालुक्यातील कोंढावळे, जोर व इतर संवेदनशील धोकादायक गावांसाठी शिवाजी जगताप उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 02 यांची नियुक्ती केली आहे. तर जावली तालुक्यातील बोंडारवाडी, भूतेघर, वहिटे व इतर संवेदनशील धोकादायक गावांसाठी सतिश धुमाळ, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 16 यांची नियुक्ती केली आहे.
सातारा तालुत्यातील सांडवली, केळवली, बोंडारवाडी, भैरवगड (टोळेवाडी), मोरेवाडी व इतर संवेदनशील धोकादायक गावांसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
येवतेश्वर घाटात कोसळलेल्या दरडी तात्काळ हटवून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तर घाटाईदेवी बायपास रस्त्यात दलदल झाल्याने रस्त्यावर खडी टाकून रस्ता पुर्ववत करण्यात आला आहे. तसेच महाबळेश्वर –तापोळा रस्ता (चिखली गाव), कराड- चिपळूण मार्ग कुंभार्ली घाट, प्रतापगड जवळ झांजवड गाव, महाबळेश्वर –पोलादपूर रस्त्याजवळ चिरेखिंडजवळ, कोळघर घाट कुसुंबी, चरेगाव-चाफळ डेरवण, दाडोली, चोपडी रस्ता, कुंभरोशी, कळमगाव, तापोळा, अहिररस्ता या ठिकाणी अतिवृष्टीमूळे दरड कोसळून वाहतूकीमध्ये अडथळा निर्माण झालेला होता. त्याठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करुन सदयस्थितीत वाहतूक सर्व ठिकाणी सुरळीत चालू आहे. वाई-जांभळी, बलकवडी फाटा, गुळंब, जोर या रस्त्यावर भगदाड पडले होते त्या उपाययोजना करुन वाहतूक सुरु आहे.
जिल्ह्यात तात्पुरते निवारा केंद्र उभारण्यात आली असून सध्या सातारा तालुक्यातील मोरेवाडी येथे 18, भैरवगड येथे 60 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सांडवली येथे 20 नागरिकांचे स्थलांतर तंबूमध्ये करण्याचे काम सुरू आहे. जावळी तालुक्यात बोंडारवाडी येथे मंदिरामध्ये 6, भुतेघर जि.प. शाळा येथे 3 नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. वाई तालुक्यात जोर येथे वरची कोळी वस्ती येथे 8 आणि गोळेगाव – गोळेवस्ती येथील 4 नागरिकांचे शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. पाटण तालुक्यात कोयना नगर वसाहत येथे मिरगाव, हुंबरळी, ढोकावळे येथील 150 नागरिकांचे तर म्हारवंड निवारा शेडमध्ये म्हारवंड गावातील 35 नागरिकांचे स्थलांतर केले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील माचूतर, एरंडल, शिंदोळा, दुधोशी, दरे, चतूरबेट, मालूसर, येर्णे येखील 65 नागरिकांनी नातेवाईकांकडे स्थलांतर केले आहे. तसेच धोकादायक गावातील नागरिकांना संबंधित तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांचेमार्फत सुरक्षित ठिकाणी अथवा नातेवाईकांचे घरी, शाळा, मंदिर येथे स्थलांतरित होणेबाबत आवाहन करण्यात आलेले आहे.