सातारा दि.17 : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अन्वये दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरणाच्या अनुषंगाने संपूर्ण देशाकरिता वैश्विक ओळखपत्र वितरण प्रणाली विकसीत केली आहे. दि. 2 ऑक्टोबर 2018 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये सदर प्रणालीद्वारे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सर्व शासकीय जिल्हा रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, तसेच विनिर्दिष्ट केलेले महानगरपालिकेचे वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये यांच्यामार्फत वितरण प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे यांनी दिली आहे.
दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र (UDID) मिळण्या संबंधीच्या सुचना पुढील प्रमाणे. दिव्यांग लाभार्थी केंद्र शासनाच्या www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली वैयक्तिक पूर्ण माहिती तसेच दिव्यांगत्वाची माहिती भरुन ऑनलाईन अर्ज करावा. दिव्यांग व्यक्तीना स्वगृही इंटरनेटची सुविधा उपलब्ध असल्यास सदरील ऑनलाईन अर्ज करता येतो. तसेच सुविधा केंद्रामध्ये (Common Service Centre CSC) अल्प मोबदला देवून ऑनलाईन अर्ज भरता येतो. अर्ज भरल्यानंतर दिव्यांग व्यक्तीस त्यांच्या अर्जाची एनरोलमेंट रिसीप्ट प्राप्त होते. सदर रिसीप्टवर त्यांच्या जिल्हयातील रुग्णालयांची यादी दिसेल अर्जदार यांना त्यांच्या दिव्यांगत्व प्रकारानुसार घराजवळील रुग्णालयात तपासणी करिता जाता येईल. सदरील ऑनलाईन अर्ज संबंधित जिल्हयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक/ अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविदयालय यांच्या लॉगीन आयडी वर उपलब्ध होतो. संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक/अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविदयालयातील अधिकारी/कर्मचारी सदरील ऑनलाईन अर्जाची पडताळणी (Verification) करतात.
पडताळणी केलेला ऑनलाईन अर्ज संबंधित दिव्यांगत्वाचे मुल्यांकन (Assessment) करणारे तज्ञांकडे पाठविला जातो. संबंधित तज्ञ त्या दिव्यांग लाभार्थ्यांचे मूल्यांकन (Assessment) करुन केलेले मुल्यांकन ऑनलाईन संकेतस्थळावर अदयावत करतो. ऑनलाईन अर्ज संबंधित रुग्णालयाच्या दिव्यांग वैद्यकीय मंडळाकडे वर्ग होतो. दिव्यांग वैद्यकीय मंडळाने दिलेले निर्देश ऑनलाईन संकेतस्थळावर अदयावत केल्यानंतर सदरील दिव्यांग लाभार्थ्याला वैश्विक ओळखपत्र व दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र ऑनलाइन उपलब्ध होते. जिल्हा शल्य चिकित्सक/ अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविदयालय यांचे कार्यालयाकडून ऑनलाईन जनरेट केलेले वैश्विक ओळखपत्र महाराष्ट्र राज्यासाठी नेमलेल्या प्रिंटिंग एजन्सीकडे ऑनलाईन हस्तांतरीत केले जाते. प्रिंटिंग एजन्सीद्वारे वैश्विक ओळखपत्रे संबंधित दिव्यांग लाभाथ्यांना स्पीड पोस्टद्वारे घरपोच प्राप्त होतात.
ज्या दिव्यांग व्यक्तींनी अद्याप दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राकरिता अर्ज दाखल केलेला नाही त्यांनी www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली वैयक्तिक पूर्ण माहिती तसेच दिव्यांगत्वाची माहिती भरुन ऑनलाईन अर्ज करुन वरीलप्रमाणे वैश्विक ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे. दिव्यांग प्रमाणपत्राकरिता अर्ज करतांना काही अडचणी आल्यास जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन डॉ. घोळवे यांनी केले आहे.