सातारा दि.23 : जिल्हा परिषदेच्या सेस योजनेंतर्गत लाभार्थ्यांची प्रवर्गनिहाय ज्येष्ठताक्रमाची यादी निश्चित करण्यासाठी प्राप्त अर्जांची सोडतीची प्रक्रिया शुक्रवार दि. 25 ऑगस्ट 2023 रोजी सर्व पंचायत समित्यांच्या स्तरावर कार्यालयीन वेळेमध्ये पंचायत समितींच्या गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सोडतीस अर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित पंचायत समितीमध्ये उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी केले आहे.
जिल्हा परिषद सेस अंदाजपत्रक 2023-24 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषि विभागामार्फत ताडपत्री, ट्रिपल पिस्टन स्प्रेपंप, सायकल कोळपे, 5/7.5 एचपी विद्युत पंपसंच, 3 एचपी विद्युत पंपसंच, 4/5 एचपी डिझेल इंजिन, एचडीपीई/पीव्हीसी पाईप, रोटाव्हेटर, पल्टीनांगर, पाचटकुटी यंत्र, खोडवा तासणी यंत्र, ट्रॅक्टरचलीत पेरणी यंत्र, मधपेट्या व बियाणे इत्यादी बाबींसाठी जिल्हा परिषदकडील स्वनिधी योजनेंतर्गत अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांकडून पंचायत समिती स्तरावर अर्ज मागविण्यात आले होते. अर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित पंचायत समिती कार्यालयामध्ये उपस्थित राहून सोडतीमध्ये सहभाग घ्यावा, असेही आवाहन श्री. खिलारी यांनी केले आहे.